शहरात दोन लाख बालकांना पोलिओची लस
विकास शिंदे
पिंपरी-चिंचवड शहरात पाच वर्षांखालील बालकांना रविवारी (३ मार्च) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम घेण्यात आली. यामध्ये शहरातील २ लाख ४ हजार १५४ बालकांचे लसीकरण केले आहे. या मोहिमेचे उद्घाटन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते थेरगाव रुग्णालयात करण्यात आले.
यावेळी सहायक संचालक व पल्स पोलिओ नोडल ऑफिसर डॉ. अनिरुद्ध देशपांडे, पालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, डॉ. किशोरी नलावडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजीराव ढगे, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. संध्या भोईर, वैद्यकीय अधिकारी, डॉ. अभिजीत सांगडे, टाटा मोटर्सचे सुनील तिवारी, हे अधिकारी तसेच नवीन थेरगाव रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.
महापालिकेने शहरातील ५ वर्षांखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण ११०९ लसीकरण केंद्रांची स्थापना केली होती. त्यापैकी सर्व मनपा रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा ९६५ ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन अशा ठिकाणी ५८ ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्ट्या, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी ८१ फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली. महापालिका हद्दीत ११०९ लसीकरण केंद्रांमार्फत ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व ७५ वैद्यकीय अधिकारी यांचे नेतृत्वाखाली २५५ पर्यवेक्षक व ३२०३ लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग, फिजिओथेरपी, फार्मसी, मॅनेजमेंट व इतर शाखेमधील महाविद्यालयीन विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम, बालवाडी शिक्षिका, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा, रोटरी क्लबचे स्वयंसेवक, टाटा मोटर्समधील स्वयंसेवक व इतर विविध सेवाभावी संस्थांच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
पोलिओ झाले का म्हणून घरोघरी जाऊन तपासणी
महापालिका कार्यक्षेत्रातील ५ वर्षांखालील बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण झाले आहे याची खात्री करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरणासाठी वापरण्यात येणारी लस जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणीत केलेली आहे. तसेच लसीकरण करणारे कर्मचारी प्रशिक्षित आहेत. आपल्या घरातील व परिसरातील ज्या बालकांचे रविवारी पल्स पोलिओ लसीकरण झाले नसेल त्यांनी घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डाॅ. गोफणे यांनी केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.