दिवसाला पीएमपीचे सरासरी दोन अपघात!
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवणाऱ्या पीएमपी बसचे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. चालू वर्षात म्हणजेच दीड महिन्यांच्या कालावधीत ९० हून अधिक अपघात झाले आहेत. म्हणजे सरासरी शहरात दिवसाला दोन अपघात होतात. विशेष म्हणजे त्यात खासगी ठेका दिलेल्या बसचे प्रमाण अधिक आहे. पिंपरी, निगडी या दोन आगारातील अपघाताची नोंद ठळकपणे यात दिसून येते. वाहनचालकांना उत्तम प्रशिक्षण नसल्याने हे अपघात घडत आहेत असे आढळते. (PMP Bus)
पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पीएमआरडीए हद्दीमध्ये बस सेवा पुरवते. सध्या २ हजारहून अधिक बसेस विविध मार्गावर धावतात. ४७३ ई बसेस सार्वजनिक सेवा पुरवतात. त्यापैकी ९० टक्के बसेस बाहेर मार्गावर असतात. त्यातील बहुतांश बसचे किरकोळ व बऱ्याच वेळा मोठे अपघात होत आहेत. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, रस्त्याच्या कडेला असलेले पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन या कारणामुळे अपघात होत असल्याचे वाहनचालक सांगतात. मात्र, अनेकदा बस नियंत्रण सुटणे, दुभाजक दृष्टीस न पडणे व गर्दीत चालवण्याच्या अनुभवाचा अभाव यामुळे देखील अपघात होतात.
पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत चालू वर्षात ९० अपघातांची नोंद आहे. जानेवारी महिन्यामध्ये २ तर, फेब्रुवारी महिन्यात जवळपास २८ अपघात झाले आहेत. दुचाकी, मोटार घासणे, दुभाजकावर बस धडकणे, सिग्नलच्या दरम्यान अचानक पुढील वाहन थांबणे अशी काही अपघाताची कारणे आहेत.
त्यातच पिंपरी, निगडी या दोन आगारातील बसचे अपघात सर्वाधिक असल्याची नोंद आहे. अपघात झाल्यानंतर त्याची माहिती पीएमपीएमएलच्या अपघात कक्षाला दिली जाते. जेणेकरून तेथून मदत मिळू शकेल. तसेच, पोलिसांनादेखील पाचारण केले जाते. अपघातामध्ये बस चालकाची चुकी असल्यास त्याची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळवली जाते. त्यानुसार त्याच्यावर निलंबनाची कारवाईदेखील होऊ शकते. अनेकदा अपघात झाल्यानंतर गर्दी होते व बस थांबवली जाते. त्यामुळे प्रवासी ताटकळत थांबतात. पोलीस व पीएमपीएमएलचे अधिकारी मध्यस्थी करून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात.
बीआरटीमध्ये दोघांचा मृत्यू
जुन्या पुणे- मुंबई मार्गावरील बीआरटी धोकादायक असून, या मार्गावर अपघात सातत्याने घडत आहेत. चालू वर्षात फुगेवाडी ते दापोडी दरम्यान बीआरटी मध्ये उडी मारून आत आलेल्या दोघांना बसचा मोठा फटका बसला. त्यात दोघांचा अंत झाल्याची घटना घडली आहे. सातत्याने नागरिक बीआरटीमध्ये शिरल्याने किरकोळ अपघातही घडले आहेत.
ठेकेदारी बस अपघातात आघाडीवर
पीएमपीने ठेकेदारीनुसार चालवण्यास दिलेल्या बसचालकांच्या अनेक तक्रारी आहेत. महामंडळाच्या १००६ स्वतःच्या मालकीच्या बसेस आहेत. तर, खासगी (ठेकेदार) १०२२ बस आहेत. या वाहनांच्या सर्वाधिक अपघात असल्याच्या नोंदी पीएमपीएलने घेतल्या आहेत. चालू वर्षात चार चालकांवर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे. दरम्यान, या चालकांना आवश्यक प्रशिक्षण देणे गरजेचे असून, गर्दीच्या ठिकाणी प्रशिक्षित चालक नेमावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
ठेकेदारांच्या बसचे प्रमाण वाढले आहे. त्यांना नोकरीबद्दल जास्त आत्मीयता नसते, यामुळे बेजबाबदारपणे बस चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा वाहतूक कोंडीमध्ये बस अडकल्याने काही बसच्या निर्धारित धावा पूर्ण होत नाहीत, त्यामुळे काही बसचालक ट्रिप पूर्ण करण्याच्या कारणासाठी रिकाम्या रस्त्यावरून वेगाने बस चालवतात. त्यातून अनेकदा अपघात घडतात.
- रुपेश केसेकर, पुणे प्रवासी मंच
वैध वाहन परवाना तपासूनच त्यांची चालक म्हणून नेमणूक केली जाते. पीएमपीएमएलच्या वतीने वाहकांना प्रशिक्षण देण्यात येते. आरटीओ अधिकारी देखील मार्गदर्शन करण्यासाठी आगारात येत असतात. त्यांच्याशी संवादही साधला जातो.
- सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.