पिंपरी-चिंचवड : इंद्रायणी नदीपात्रात भराव टाकून प्लाॅटिंग!
महापालिकेच्या हद्दीत इंद्रायणी नदीपात्रालगत, (Indrayani River) तसेच पूररेषेच्या जागेतच राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत प्लॉटिंग (Unauthorized plotting) करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. स्थानिकांकडून लाखो रुपयांना प्लाॅटची विक्री करत नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांना सदरचा प्लाॅट एनए झाला असून रेसिडेन्सियल असल्याचे सांगून फसवले जात आहे. याकडे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयासह बांधकाम परवाना विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पवना नदीनंतर महापालिका व पीएमआरडीए हद्दीतून इंद्रायणी नदी वाहते. इंद्रायणीच्या पात्रातही मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून अनधिकृत विनापरवानगी बांधकामे, अतिक्रमण करण्याचे प्रकार सुरू आहेत.
नदीपात्रालगत भराव, राडारोडा टाकून प्लाॅटिंग होत आहे. ब्लू लाईनमध्ये जागेचे ले - आऊट करून प्लाॅटची विक्री होत आहे. नदीपात्रात हे प्रकार होऊ लागल्याने भविष्यात गंभीर पूरस्थिती उदभवणार आहे.
या भागात इंद्रायणी नदीपात्रालगत तसेच पूररेषेतच अर्धा, एक, दोन गुंठ्यांचे छोटे भूखंड तयार केले आहेत. हे प्लाॅटिंग विनापरवाना असूनही नागरिकांकडून विकत घेतले जात आहेत. त्यावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत.
महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी (दि. २२) चिखलीतील संतपीठ पाठीमागे चालू असलेल्या तीन मोठ्या बांधकामांवर कारवाई केली. ही बांधकामे तेथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या प्लॉटिंगमध्ये केली जात होती. त्यावर पालिकेने केलेल्या कारवाईमुळे या भागातील अनधिकृत प्लॉटिंग करणारे व लाखो रुपये गुंतवणूक करून भूखंड विकत घेणाऱ्या नागरिकांची चिंता वाढली आहे.
इंद्रायणी नदीपात्रात बांधकामे सुरू होती, ती पाडण्यात आली. तसेच येथे प्लॉटिंग करणाऱ्यांना नोटीस देण्यात येणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. २२) चिखली संतपीठाजवळ ही पाडापाडीची कारवाई केली. या प्लॉटिंगमध्ये चालू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेने कारवाई केली आहे.
- सीताराम बहुरे, सहायक आयुक्त, फ क्षेत्रीय अधिकारी, महापालिका
भूखंड घेणाऱ्यांची फसवणूक
चिखली परिसरात इंद्रायणी नदीपात्रात अनेक ठिकाणी भराव टाकून आणि पूररेषेत प्लाॅटिंग करण्यात येत आहे. यामध्ये संतपीठ येथील बाग वस्ती परिसरात प्लॉटिंग करण्यात आले आहे. एनए झालेले आणि आर झोन केलेले अशी जाहिरात करून अर्धा, एक, दोन गुंठ्याचे छोटे भूखंड नागरिकांकडून विकत घेतले जात आहेत. त्यावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. दरम्यान, पालिकेने केलेल्या कारवाईमुळे या भागातील अनधिकृत प्लॉटिंग करणारे व लाखो रुपये गुंतवणूक करून भूखंड विकत घेणाऱ्या नागरिकांची चिंता वाढली आहे.
राजकीय आशीर्वाद
नदीपात्रात पूररेषेत अनधिकृत प्लाॅटिंग करून त्यांची बेकायदेशीर विक्री करणा-यांवर पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेकडून कुठलीही कारवाई केलेली नाही. मात्र, महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाकडून विनापरवानगी बांधकाम करणाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे जागा घेणाऱ्या नागरिकांचे नुकसान झाले. परंतु, प्रत्यक्षात नदीपात्रालगत सुरू असलेल्या अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांवर पालिकेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत पालिका अधिकाऱ्यांकडून हात वर केले जात आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.