संग्रहित छायाचित्र
पुणे मेट्रोच्या (Pune Metro) स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) या मार्गाचे विस्तारीकरण पुढे निगडीपर्यंत होणार आहे. या विस्तारीत मार्गाचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) केंद्र शासनाने मंजूर केल्यानंतर येत्या तीन महिन्यात या मार्गाची निविदाप्रक्रिया पूर्ण करून काम सुरू केले जाईल. पिंपरी ते निगडीपर्यंतच तीन स्टेशन हे रस्त्याच्या उजव्या बाजूला उन्नत मार्गावर असेल, अशी माहिती महामेट्रो व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (Shravan Hardikar)यांनी दिली आहे. (PCMC)
पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर पहिल्या टप्प्यात पिंपरी ते फुगेवाडी या दरम्यान पासून मेट्रोसेवा सुरू झाली. तर, सद्यस्थितीत पिंपरी ते सिव्हिल कोर्टदरम्यान मेट्रो धावत आहे. मात्र, य मेट्रोमार्गाचे विस्तारीकरण पुढे पिंपरीपासून निगडीपर्यंत व्हावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवडकरांची होती. मात्र, मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळ हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी प्रलंबित होता. अखेर २३ ऑक्टोबर २०२३ रोजी केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी आवास मंत्रालयाने अंतिम मान्यता दिली. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी ते निगडी हा मार्ग ४.१३ किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचे शहरवासीयांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हे विस्तारीकरण आवश्यक होते. हा मेट्रो प्रकल्प शहराच्या दळवळणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
पिंपरी ते निगडी दरम्यान तीन मेट्रो स्टेशन असून शेवटचे स्टेशन भक्ती-शक्ती चौकात असणार आहे. मेट्रो मार्गासाठी जागेच्या भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही. परंतु, स्टेशनसाठी रस्त्याच्या बाजूला काही जागेचे भूपसंपादन करावे लागेल. महामेट्रोकडून निविदाप्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. येत्या तीन महिन्यात निविदाप्रक्रिया पूर्ण करून या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल. विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम जलद गतीने करण्याचा प्रयत्न राहील. तीन वर्षात या मार्गावर मेट्रोतून प्रवासी वाहतूक करण्याचे नियोजन आहे.
प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न...
पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर पिंपरी ते सिव्हील कोर्ट मेट्रो सेवा सुरू आहे. यामध्ये पिंपरी स्टेशनवरून अधिक प्रवासी संख्या आहे. परंतु, इतर स्टेशनवरून प्रवासी संख्या अत्यल्प आहे. सर्वच मेट्रो स्टेशनवरून प्रवासी संख्या कशी वाढेल ? जास्तीत जास्त शहरवासीयांना मेट्रो प्रवासाकडे आकर्षित करणे आणि त्यासाठी का करावे लागेल, याचा अभ्यास केला जात आहे. त्यानुसार सुधारणा करण्यात येत आहेत. महामेट्रो प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतेही दुर्लक्ष करणार नसून सर्व खबरदारी घेत आहोत, असे हर्डीकर यांनी सांगितले.
चालण्याची मानसिकता रुजवायला हवी..
नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून मेट्रोचा प्रवास करायचा आहे. मात्र, घरापासून मेत्रोपर्यंत जाण्याचा योग्य पर्याय अजून नागरिक निवडू शकलेले नाही. प्रत्येकाने जर खासगी वाहन घेऊन मेट्रो स्टेशनला येण्याचा विचार केला, तर त्या वाहनांसाठी पार्किंग कशी उपलब्ध करावी, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून निघतानाच सार्वजनिक वाहतूक तसेच काही अंतर चालण्याची मानसिकता रुजवायला हवी, असे हर्डीकर यांनी स्पष्ट केले.
दापोडी ते निगडी ग्रेड सेपरेटर (समतल विलगक) आहे. तर पिंपरी ते बोपोडी मेट्रो उन्नत मार्ग आहे. त्यामुळे पिंपरी ते निगडी या मार्गावरील तीन स्टेशन हे देखील उन्नत मार्गावर असणार आहेत. तर स्मार्ट सिटी कडून दापोडी ते निगडी या मार्गावर अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट योजनेंतर्गत रस्ता विकसित केला जाणार आहे. मेट्रो मार्ग उजव्या बाजूला असल्याने पिंपरी ते निगडी या मार्गावर अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट योजना डाव्या बाजूला नियोजित करण्यात आल्याची माहिती स्मार्ट सिटीचे संचालक तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त-प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.