पिंपरी चिंचवड: पाणीबचतीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या रोझलँड सोसायटीतच पाणी टंचाई

पाणी बचत केल्याने राष्ट्रीय पातळीवर गौरव झालेल्या पिंपळे सौदागरमधील रोझलँड सोसायटीत देखील पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तेथील सोसायटीत राहणाऱ्यांना महापालिकेकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे.

पाणीबचतीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या रोझलँड सोसायटीतच पाणी टंचाई

नागरिकांचे हाल, टँकरवरच भागवावी लागते गरज

पाणी बचत केल्याने राष्ट्रीय पातळीवर गौरव झालेल्या पिंपळे सौदागरमधील (Pimple Saudagar) रोझलँड सोसायटीत (Roseland Society) देखील पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तेथील सोसायटीत राहणाऱ्यांना महापालिकेकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. (Roseland Society Water Crisis)

उन्हाळ्यामुळे दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र पाण्याची मागणी वाढत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात ४२ टक्के पाणीसाठा आहे. जून अखेरपर्यंत काटकसरीने ते पाणी वापरुन शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागणार आहे. शहरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये पाण्याची मागणी जास्त आहे. महापालिका प्रति माणसी १३५ लिटर नूसार पाणी पुरवठा करते. तरी देखील शंभरपेक्षा अधिक फ्लॅट असणाऱ्या सोसायट्यांना  टँकर शिवाय पर्याय नाही. (Water Crisis in Pimpri Chinchwad)

सध्या रोझलँड सोसायटीला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दिवसाला ३५ ते ४० टँकर बाहेरुन मागावे लागत आहेत. त्यामुळे वर्षाला लाखो रुपये टॅंकरवर खर्च होत आहेत. महापालिका पाण्याच्या ४० टक्के गळतीची कबुली देते. प्रत्यक्षात शहरातील नागरिकासह सोसायट्यांना काटकसरीने व जपून पाणी वापरायला सांगितले जाते. पण, महापालिका प्रशासनाने प्रत्यक्षात पाणी गळती कुठे होते, ते पाहात नाही. ४० टक्के पाणी गळती रोखण्यासाठी कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव टँकर लॉबी पोसली जात आहे.

दरम्यान, शहरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्यास महापालिका सक्षम नाही. त्यामुळे टँकर व्यावसायिकांना दोष देण्यात अर्थ नाही. उलट ते लोकांची गरज पैसे घेऊन का होईना भागवत आहेत. मात्र, काहीजण महापालिकेचे फुकटात पाणी चोरून हजारोंना टँकर विकतात ही जनतेची लूट आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देवून सोसायट्यांनी पाणीटंचाई येऊ नये म्हणून काही उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

पाण्यामुळे सोसायट्यांत वाढली कटुता

रावेत, किवळे, ताथवडे, पुनावळे, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, मोशी, चिखली, च-होली येथे सोसायट्यांची संख्या अधिक असल्याने लोकसंख्या देखील वाढली आहे. तेथील सोसायट्या महापालिकेला सर्वाधिक कर भरतात. त्यांनाच टँकरची बिलेही भरावी लागत आहेत. पाण्यामुळे सोसायट्यांत रोज कटकटी, शाब्दिक बाचाबाची सुरू आहे. याचे रूपांतर कधीही मारामाऱ्यात होऊ शकते. नळाचे पाणी गेले की मोलकरणी काम अर्धवट सोडून निघून जातात. वॉशिंग मशीन अनेकदा नादुरुस्त होतात. पाणी नाही म्हटल्यावर बरेच जण नळ तसाच उघडा ठेवतात आणि कामावर निघून जातात. मग टँकर आल्यावर ओव्हर हेड टँकमधून पाणी सोडले की नळातून दिवसभर वाहत राहते.

शहरात सुमारे सहा हजार सोसायट्या असून, बहुतेक टँकरवर अवलंबून आहेत. एक सोसायटी परिस्थितीनुसार सरासरी पाच ते २० टँकर मागवते. त्यामुळे उन्हाळ्यात चार महिन्यांसाठी दररोज सरासरी दहा टँकर पाहिल्यास एका सोसायटीला एका वर्षासाठी बारा लाखांचा खर्च येतो. त्यामुळे महापालिका सर्व रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा न करता बेकायदेशीरपणे टँकर घेण्यास भाग पाडत आहे.

- उदय साबदे, रहिवाशी, पार्क रॉयल सोसायटी

पाणीबचतीकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. आमच्या सोसायटीने पाणीबचत करुन राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवले. पण, आता आम्हालाही टॅंकरने पाणी मागवावे लागत आहे. आमच्या रोझलँड सोसायटीला सध्या दिवसाला ४० टँकर पाणी लागत आहे. सध्या महापालिका पाणी पुरवठा विभाग आणि सोसायटीधारक नागरिकांमध्ये तहान लागली की विहीर खोेदण्याची वृत्ती तयार झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी बचत केली जात नाही. त्याचे परिणाम उन्हाळ्यात भोगावे लागत आहेत. प्रशासनाने पाणीगळतीच्या समस्येकडेही गांभीर्याने पाहिले पाहिजे.

- संतोष म्हसकर, रहिवासी, रोझलँड सोसायटी

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest