संग्रहित छायाचित्र
पंकज खोले
शहरातील तलाठी कार्यालय आणि निगडीतील शिधापत्रिका कार्यालयात नागरिकांना वेळेवर कामे होत नसल्याने हेलपाटे मारावे लागत आहे. प्रत्यक्षात ३१ तलाठी कार्यालयांचा कारभार ८ तलाठ्यांवर तर, शिधापत्रिका कार्यालयाचा पुरवठा निरीक्षकांवर सुरू आहे. परिणामी, नागरिकांच्या तक्रारी आणि त्याची दखल घेण्यासाठी अधिकारीच नसल्याने तक्रार करायची कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
निगडी येथील शिधापत्रिका कार्यालय 'ज' विभागाचा कारभार परिमंडल अधिकाऱ्याऐवजी पुरवठा निरिक्षकाद्वारे केला जात आहे. तीन महिन्यांपूर्वी बदली झालेल्या परिमंडल अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. आचारसंहितेमुळे ही नियुक्ती रखडली होती. आता नवीन अधिकारी नियुक्त केला जाईल, अशी माहिती कार्यालयाच्या वतीने सांगण्यात येत आहे. पुरवठा निरीक्षकच अतिरिक्त कामे करू लागल्यास नागरिकांच्या तक्रारींची दखल घेणार कोण, असा प्रश्न आहे. यापूर्वीच येथील शिधापत्रिका कार्यालयात वेळेवर काम होत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, अर्जदारांना ऑनलाइन कामाचा सल्ला या ठिकाणी दिला जातो. नागरिकांना दाराच्या बाहेर. तर, ठराविक एजंटांना आत प्रवेश दिला जातो. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे नवीन नियुक्ती, पदोन्नतीच्या प्रक्रियेला खो बसला. त्यामुळे अद्याप नवीन अधिकारी नेमला नाही. त्यामुळे तेथील पुरवठा निरीक्षकांना तात्पुरते परिमंडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.
दुसरीकडे, राज्य शासनाने घेतलेल्या तलाठी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची अद्याप नियुक्ती केली नाही. त्यामुळे शहरात २३ कार्यालयाला तलाठ्यांची प्रतीक्षा आहे. सध्या केवळ आठ तलाठी कार्यरत असून त्यांच्यावर २३ कार्यालयांच्या कामकाजाचा अतिरिक्त भार पडला आहे. परिणामी नागरिकांची कामे रखडत आहेत. त्यातच एका तलाठीवर एक किंवा दोन अशा तलाठी कार्यालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे एकाही कार्यालयात पूर्ण वेळ तलाठी भाऊसाहेब मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. यामुळे नागरिकांना वेळेवर कमी होण्याऐवजी त्यांचे हेलपाटे मारण्यामध्ये दिवस जात आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.