भर रस्त्यात मधोमध बिनकठड्याची विहीर
विकास शिंदे:
वाकड परिसरातील इरो स्कूलकडून जाणोबा चौकाकडे जाणा-या २४ मीटर रस्त्यावरील स्नेहांगण सोसायटीसमोर असलेली खासगी मालकीची धोकादायक विहीर अद्यापही कायम असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण ठरू लागली आहे. सदरची विहीर बुजवण्यास जागामालकाचा नकार असून रस्त्यासाठी जागा ताब्यात दिलेली नाही. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध असलेली विहिरीचा अडथळा कधी दूर होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या विहिरीला कठडे नसल्याने सर्वांसाठी धोकादायक ठरत आहे.
वाकड (Wakad) येथील इरो स्कूलकडून जाणोबा चौकाकडे जाणा-या रस्त्यावरील स्नेहांगण सोसायटीसमोर कित्येक वर्षापासून खासगी मालकीची ही विहीर आहे. महापालिकेच्या २४ मीटर रस्त्याच्या मधोमध ही विहीर असून विहिरीचा वाहतुकीला अडथळा ठरू लागला आहे. महापालिकेने २४ मीटर रस्ता विकसित केला आहे. मागील पाच- सहा वर्षांपासून रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर अद्यापही कायम आहे. स्नेहांगण सोसायटीसमोर ही विहीर असल्याने नागरिकांनादेखील अडचणीचा सामना करावा लागत आहे.
कित्येक वर्षांपासून रस्त्याच्या मधोमध असलेली ही धोकादायक विहीर कायम आहे. त्यामुळे रस्ता माहिती नसणा-या वाहनचालकांच्या वाहनांची धडक होऊन किरकोळ अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. वाकड परिसरात अनेक सोसायटी तयार झाल्या आहेत. नागरिकांना पायाभूत सोयी -सुविधा महापालिकेकडून देण्यात येत आहे. ड क्षेत्रीय कार्यालयाकडून मुख्य आणि अंतर्गत रस्तेदेखील विकसित केले जात आहे. नागरिकांना चांगले रस्ते, पदपथ, सायकल ट्रॅक, पथदिवे आणि रस्ते दुभाजकही झाडांनी आकर्षिक बनविले जात आहेत. पण, पालिकेच्या २४ मीटर रस्त्याच्या मधोमध असलेल्या या धोकादायक विहिरीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
काही दिवसांपूर्वी याच परिरात लागलेल्या आगीमुळे महापालिकेची अग्निशमन गाडीलाही रस्त्यावरील विहिरीमुळे वळण घेता आले नाही. तेथील अनेक सोसायटीतील नागरिकांना विहिरीमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने पाच ते सहा वर्षांपासून रस्ता बनविला आहे. पण, अद्यापही धोकादायक विहीर तशीच आहे. सदर विहीर बुजवण्यास खासगी जागामालकाचा नकार आहे. त्या विहिरीमुळे रस्ता तयार करण्यास अडथळा येत आहे.
महापालिकेने धोकादायक विहिरीची जागा ताब्यात घेऊन बंदिस्त करण्याचे ठरविले आहे. याकरिता स्थापत्य विभागाकडून नगररचना विभागाला पत्र देण्यात आले आहे. त्या विहिरीची जागा भूसंपादन कायद्यानुसार ताब्यात घेतली जाणार आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीस मोकळा होणार आहे.
सोसायटीला अडथळा
वाकडच्या इरो स्कूल कडून जाणोबा चौकाकडे जाणा-या रस्त्यावरील स्नेहांगण सोसायटी समोरच २४ मीटर रस्त्याच्या मधोमध असलेल्या धोकादायक विहिरीला कठडे नसल्याने वाहने पडून अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिकेने सदर धोकादायक विहीर ताब्यात घेऊन बंदिस्त करण्याचे ठरवले होते. पण, सदर विहिरीचे जागामालक ती ताब्यात देण्यास नकार देत आहे. अनेक वेळा खासगी वाटाघाटीदेखील झालेल्या आहेत. ती विहीर पूर्णपणे न बुजविता त्यावर सिमेंट काॅंक्रिट टाकून रस्ता तयार करण्याचे ठरविले होते. त्याला जागामालकाचा नकार आहे. या धोकादायक विहिरीमुळे रस्ता अरुंद झाला आहे. यातूनच लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढले. नागरिकांच्या मागणीनुसार धोकादायक विहीर बंदिस्त करून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात यावा, जेणेकरून रस्त्यावरून रहदारी करण्यास वाहनांना कोणताही अडथळा येणार नाही.
वाकडमधील इरो स्कूलकडून दत्तमंदिर रस्त्याकडे जाणारा अंतर्गत २४ मीटर रस्ता आहे. त्या रस्त्याच्या मधोमध धोकादायक विहीर आहे. या भागात नागरिकांची प्रचंड वर्दळ आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्याचे काम पूर्ण करत आहे. पण, पाच ते सहा वर्षांपासून विहिरीचा अडथळा निर्माण झाला आहे. स्थापत्य विभागाकडून भूसंपादन प्रक्रियेसाठी नगररचना विभागाकडे पत्र दिले आहे. त्यानुसार रस्त्यावरील विहिरीचा जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण केले जाईल.
- देवण्णा गट्टूवार, कार्यकारी अभियंता, ड क्षेत्रीय कार्यालय,महापालिका, पिंपरी चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.