थरमॅक्स चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच
विकास शिंदे
आकुर्डी-चिखली रोडवरील थरमॅक्स चौकात (Thermax Square) अनेक दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक, कामगार, उद्योजक, विद्यार्थी, कंपन्यातील अधिकारी मोठा संताप व्यक्त करत आहेत. त्यात खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांमुळे मोठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे छोट्या-मोठ्या दुकानांचे अतिक्रमण प्रचंड वाढले आहे. याकडे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने दुर्लक्ष केले असून वाहतूक कोंडीत सुटेना झाली आहे. याकडे वाहतूक पोलिसांकडून देखील दुर्लक्ष झाले आहे.
आकुर्डी-चिखली रस्त्यावर (Akurdi-Chikhali road) प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) होत आहे. ही वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली असून सर्वसामान्य नागरिकांसह कामावर जाणाऱ्या कामगारांनादेखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. थरमॅक्स चौकातील टपऱ्या आणि अनधिकृत पार्किंग मोठ्या प्रमाणात आहे, तेथे खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात थांबतात. शिवाय अनेकदा वाहन चालक रॉंग साईडने गाड्या घालतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. ऑटो रिक्षावाले अनेकदा सिग्नल तोडून वाहतूक करताना दिसत आहेत. चौकातील अनेक इमारतींना स्वतःची पार्किंग सुविधा नसल्याने ग्राहक रस्त्यावरच गाड्या पार्क करतात. वास्तविक, याकडे वाहतूक पोलीस प्रशासन लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, परिसरातील इतर भागातही वाहतूक कोंडीतून मार्ग शोधणे वाहनचालकांसह नागरिकांना जिकिरीचे झाले आहे. सततची वाहतूक कोंडी, संभाजीनगर परिसरातील नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे, पण वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? वाहतूक कोंडी का सुटत नाही, असा सवाल नागरिक, कामगार करत आहेत.
आकुर्डीवरून चिखली गावात जाण्यासाठी चार किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक तास लागतो. साने चौकापासून चिखलीपर्यंतचा रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंबंधी अनेकदा महानगरपालिकेत प्रश्न उपस्थित केला. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रवासी, विद्यार्थी, उद्योजक आदींचे हाल होत आहेत. पोलीस व संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, त्यामुळेच वाहतूक कोंडी होत आहे.
-शिवानंद चौगुले, सामाजिक कार्यकर्ता
Thermax Square Traffic
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.