पिंपरी-चिंचवड: करोडो खर्चून बांधलेला टाऊन हॉल धुळीखाली!
विकास शिंदे
महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून चिखलीत करोडो रुपये खर्चून बांधलेला टाऊन हाॅल गेल्या तीन महिन्यापासून धूळखात पडून आहे. चिखली परिसरातील नागरिकांना विविध कार्यक्रमासाठी हा हॉल देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या पैशातून बांधलेला टाऊन हाॅल वापराविना पडून राहिला आहे. टाऊन हाॅलचे उद्घाटन झाल्यानंतर स्थापत्य विभागाची हस्तांतर प्रक्रिया रखडल्याने नागरिकांना टाऊन हॉल दिला जात नसल्याचे कारण सांगितले जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने तब्बल ११ कोटी खर्च करुन सोनावणे वस्ती परिसरात हा टाऊन हाॅल बांधला आहे. या टाऊन हॉलमध्ये महिलांसाठी व्यायाम शाळा, कार्यक्रमासाठी सभागृहाची व्यवस्था केली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, त्यानंतरही टाऊन हॉल धूळखात पडून आहे. या टाऊन हॉलचे उद्घाटन झाल्यानंतर चिखली, तळवडे, संभाजीनगर, जाधववाडी आणि कुदळवाडी परिसरातील नागरिकांना हक्काचे सभागृह उपलब्ध झाल्याचे वाटत होते. परंतु, वर्षभरापूर्वी बांधून तयार झालेला हा टाऊन हॉल गेले कित्येक महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता.
अनेक वेळा उद्घाटने पुढे गेल्याने तो बंद राहिला होता. दोन ते अडीच महिन्यांपूर्वी हॉलचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, आता कार्यक्रम घेण्यासाठी अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. अनेक नागरिक, खासगी आणि सामाजिक संस्थांनी कार्यक्रमासाठी हा हॉल मिळावा यासाठी महापालिकेकडे विचारणा केली. मात्र, महापालिकेचा स्थापत्य विभाग, भूमी जिंदगी, ‘फ’ प्रभाग आणि क्रीडा विभाग यांच्या दिरंगाईमुळे नागरिकांना तो अद्याप वापरासाठी उपलब्ध होऊ शकलेला नाही.पालिकेच्या स्थापत्य विभागाच्या सावळ्या गोंधळात नागरिकांना तो भाड्याने वापरासाठी दिला जात नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
चिखलीतील टाऊन हाॅल बांधून उदघाटनासाठी वर्षभर प्रतिक्षेत राहिला होता. त्यानंतर आता उदघाटन होऊनही दोन - तीन महिने लोटले आहेत. तरीही तो नागरिकांना वापरण्यास दिला जात नाही. स्थापत्य , भूमि व जिंदगी, फ क्षेत्रीय कार्यालय अधिका-यांच्या सावळा गोंधळामुळे तो वापरण्यास मिळत नाही. अजून किती दिवस हा टाऊन हाॅल धूळखात ठेवला जाणार आहे. पाच जूनपर्यंत तो नागरिकांसाठी खुला न केल्यास आंदोलन करण्यात येईल.
- विकास साने, सामाजिक कार्यकर्ते, चिखली
सोनावणे वस्ती (चिखली) येथील टाऊन हाॅलची पाहणी केली. स्थापत्य विभागाने अद्याप भूमि व जिंदगी विभागाकडे हस्तातंर केलेला नाही. स्थापत्य विभागाकडून हस्तातंर प्रक्रिया सुरु केली आहे. आमच्या ताब्यात आल्यानंतर तो क्रीडा विभाग आणि फ क्षेत्रीय कार्यालयाकडे हस्तांतर केला जाईल. त्यानंतर नागरिकांना टाऊन हाॅल भाड्याने वापरण्यास दिला जाईल. हे काम आचारसंहितेनंतर पुर्ण होईल.
- मुकेश कोळपे, सहायक आयुक्त, भूमी जिंदगी विभाग, महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.