पिंपरी-चिंचवड: मुख्य चौकातील रस्ताच बनलाय पार्किंगचा स्पॉट; केएसबी चौकातील रस्त्यावर दुतर्फा वाहनांचे पार्किंग

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. परिणामी , शहरातील रस्त्यांवर पार्किंगची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे मिळेल त्या जागी अन् मिळेल तिथे वाहनांचे पार्किंग होऊ लागले आहे.

पिंपरी-चिंचवड: मुख्य चौकातील रस्ताच बनलाय पार्किंगचा स्पॉट; केएसबी चौकातील रस्त्यावर दुतर्फा वाहनांचे पार्किंग

महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

पंकज खोले

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. परिणामी , शहरातील रस्त्यांवर पार्किंगची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे मिळेल त्या जागी अन् मिळेल तिथे वाहनांचे पार्किंग होऊ लागले आहे. पदपथ, उड्डाणपूल या ठिकाणी पार्किंग सर्रास होते. मात्र यापुढे जाऊन थेट रस्त्यावरच वाहनाचे पार्किंग होत असल्याचे दिसून आले आहे.

निगडी-भोसरी रस्त्यावर असलेल्या या चौकात मोटारी, प्रवासी बसेस त्याचप्रमाणे अवजड वाहने देखील पार्क करण्यात येतात. यामुळे अर्ध्याहून अधिक रस्ता व्यापला आहे. परिणामी इतर वाहन चालकांना त्यातून कसाबसा मार्ग काढावा लागतो. रात्रीच्या वेळी अशाप्रकारे बेशिस्त पार्क केलेल्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. सध्या भोसरी रस्त्यावरती खोदाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. त्यातच पुढे गेल्यानंतर केएसबी चौकात भर रस्त्यामध्येच दोन्ही बाजूला पार्क केलेल्या वाहनांमुळे पुन्हा वाहनचालकांना ब्रेक मारावा लागतो.

चिंचवड स्टेशन येथून येणारी वाहने,  त्याचप्रमाणे भोसरीच्या दिशेने येणारी वाहने या ठिकाणी राजश्री शाहू महाराज उड्डाणपूल खालील चौक पार केल्यानंतर पुढील रस्त्यावरच दोन्ही बाजूला ही वाहने पार केलेली असतात. जवळपास एक किलोमीटर रस्त्यावर अशाप्रकारे दिवस-रात्र वाहने येथेच असतात. जवळपास असलेले हॉटेल, वाहनांचे शोरूम, छोट्या कंपन्या यांना पार्किंग नाही. त्यामुळे सोयीस्कर म्हणून थेट रस्त्यावरच वाहने पार्क केली जातात. एवढेच नव्हे तर, हा रस्ता म्हणजे वाहने पार्क करून गप्पागोष्टी करण्याचे सध्या ठिकाण झाले आहे. दुपारच्या वेळी अनेक मोटारी शेजारी शेजारी पार करून या ठिकाणी चालक गप्पा मारताना दिसून येतात. मात्र, येथून जाणाऱ्या वाहनांना त्याचा मोठा अडथळा निर्माण झालेला आहे.

... तर सर्व्हिस रस्त्याचा वापर

चिंचवड स्टेशन आणि भोसरी या दोन ठिकाणी येणारी वाहने निगडीच्या दिशेने वाळताना सर्व्हिस रस्त्याचा वापर करतात. वाहनचालकाच्या लक्षात न आल्याने ते थेट आपले वाहन सर्व्हिस रस्त्यावर नेतात.

परिणामी, या रस्त्यावर वाहतूक कमी होते. त्यामुळे महापालिकेने विकसित केलेल्या या रस्त्यावर सध्या वाहन पार्किंग जोमाने सुरू आहे. त्यातच प्रवासी बस आणि अवजड टेम्पो पार्क करून निवांत आराम करत असल्याचे देखील दिसून येतात.

रस्त्यावरही बेशिस्त पार्किंग

केएसबी चौकातून चिखली स्पाईन रस्त्यावर देखील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जातात. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सायकल ट्रॅकवर सर्रासपणे स्थानिक नागरिक वाहने पार्क करतात. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना चालकांना करावा लागतो. तसेच, जुन्या आरटीओ रस्त्याच्या समोर देखील अवजड वाहने पार्क केली जातात.

बेशिस्त वाहनचालकांवर वेळोवेळी कारवाई सुरू असते. या ठिकाणांची पाहणी करण्यात येणार असून, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल. त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
-शहाजी पवार, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest