संग्रहित छायाचित्र
पंकज खोले
वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी RC) नागरिकांना पत्त्यावर मिळण्यासाठी केलेला खटाटोप वाया जात असून, या वर्षभरात जवळपास १२ हजाराहून अधिक आरसी परत आले आहेत. अर्जदारांना ते मिळण्यासाठी पोस्ट ऑफिस व आरटीओत चकरा मारण्याची वेळ येते, तर किचकट प्रक्रियेमुळे अनेक अर्जदार वर्षानुवर्षे हे आरसी बुक नेत नसल्याचे दिसून येते. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान एकूण १२ हजार ३८४ अर्जदारांचे पत्ते सापडले नाहीत.
आरटीओ (RTO) व पोस्ट ऑफिसचा (Post Office) ढिसाळ कारभार आणि समन्वयाच्या अभावामुळे वाहनमालकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पैसे देऊनही आरसी मिळवण्यासाठी नागरिकांची दमछाक होत आहे. सन २०१२ पासून परिवहन विभागाकडून स्मार्ट कार्ड स्वरूपात आरसी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अगोदर ही आरसी डिलर्सकडेच मिळत असे; मात्र स्मार्ट आरसी सुरू झाल्यापासून पोस्टामार्फत नागरिकांना त्यांच्या पत्यावर पाठवले जातात. त्यासाठी पोस्टाचे पैसे अर्जदाराकडून घेण्यात येतात. मात्र, त्यांना सेवा मिळत नसल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
परिवहन विभाग व पोस्ट ऑफिस यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना आरसी मिळत नाहीत. पत्ता सापडला नाही, घर बंद असणे, क्रमांक चालू नसणे या कारणासाठी दरवर्षी हजारोंच्या घरात आरसी परत येत आहेत. २०२२-२३ या वर्षात १३ हजार ८७२ तर २०२३-२४ या वर्षात १२ हजार ३८४ आरसी पोस्टातून परत आरटीओत आले आहेत. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या आरसी या छत्रपती संभाजीनगर येथे प्रिंट होतात. तिथून त्या चिंचवड पोस्ट ऑफिसमध्ये येतात आणि मग शहरातील विविध पोस्टात वितरित केल्या जातात. त्यानंतर पोस्टमन पत्त्यावर जाऊन आरसी नागरिकांना घरी पोहोचवतात; मात्र आरसी परत येण्याचे प्रमाण हे जवळपास दहा ते पंधरा टक्के आहे.
आरटीओ, पोस्टात नाहक हेलपाटे
वाहन खरेदी करताना आरसी बुक घरी येईल, असे सांगण्यात येते. बरेच दिवस उलटूनही ते मिळाले नसल्याने डिलर्सकडे चौकशी करतात. तेथून त्यांना आरटीओत पाठवले जाते. आरटीओत न मिळाल्यास पोस्टात चौकशी करायला सांगितले जाते, अशाप्रकारे वाहनमालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे अखेर ते आरसी बुक वाहनधारक घेतच नसल्याचे दिसून येते. मात्र, जेव्हा वाहन विकायचे असल्यास अथवा ते नावावरून घेण्यास आरसी बुकची गरज भासते. तेव्हा मात्र त्यांची तारांबळ उडते.
नागरिकांच्या सोईसाठी स्मार्ट कार्ड स्वरूपात तयार केलेले आरसी घरपोहोच मिळण्याची सुविधा देण्यात आली. अनेकांचा पत्ता न सापडल्याचे कारण देत सध्या मोठ्या संख्येने आरसी आरटीओ कार्यालयात येत आहेत. मात्र ते आम्ही पुन्हा संबंधित वाहनधारकांना देण्याचा प्रयत्न करतो.
- सोमनाथ जाधव, कार्यालयीन अधीक्षक, पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय (Pimpri Chinchwad RTO)
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.