पिंपरी चिंचवड: महापालिकेच्या राडारोड्याने झाडांची लागली वाट अन् नागरिकांचा कोंडला श्वास

महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांच्या सोयीच्या दृष्टीने बांधकाम राडारोडा टाकण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. पण, या निश्चित केलेल्या जागेवर बिल्डरांसह नागरिकांनी क्षमतेपेक्षा अधिक राडारोडा टाकला आहे.

पिंपरी चिंचवड: महापालिकेच्या राडारोड्याने झाडांची लागली वाट अन् नागरिकांचा कोंडला श्वास

महापालिकेच्या बिल्डरधार्जिण्या कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

विकास शिंदे
महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांच्या सोयीच्या दृष्टीने बांधकाम राडारोडा टाकण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. पण, या निश्चित केलेल्या जागेवर बिल्डरांसह नागरिकांनी क्षमतेपेक्षा अधिक राडारोडा टाकला आहे. माती, सिमेंट, लाकूट, प्लॅस्टिक, कचऱ्याने रावेतच्या भोंडवे बाग समोर तीन ते चार मजली डोंगर तयार झाला आहे. त्या डोंगरात जिवंत देशी झाडे गाडून टाकली असून देशी झाडांची देखील वाट लागली आहे. राडारोड्याने धुळीचे साम्राज्य पसरूरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) पर्यावरण विभागाकडून बांधकाम राडारोडा टाकण्यासाठी आठ ठिकाणे निश्चित केली आहेत. त्या ठिकाणावर बिल्डरांसह नागरिकांकडून राडारोडा टाकला जात आहे. रावेतमधील भोंडवे बाग समोर बांधकामाचा राडारोडा टाकण्यास जागा उपलब्ध करून दिलेली आहे. पालिकेने राडारोडा टाकण्यास जागा निश्चित केल्याने बिल्डरांची सोय झाली आहे. रावेतच्या राडारोडा ठिकाणावर माती, सिमेंट, विटा, काँक्रिट, प्लॅस्टिक, कचरा, रेती, कागद, सळई यासह अनेक सिमेंटचे गट्टू टाकले जात असल्याने सिमेंटचे डोंगर तयार होऊन तीन ते चार मजली राडारोड्याचा डोंगर तयार झाला आहे. या उंच डोंगरात ४० ते ५० फूट उंच असलेली देशी  झाडे खुलेआमपणे जिवंत गाडली जात आहेत.

झाडे गाडली गेल्याने सिमेंटच्या उष्णतेने ती मृत पावली जात आहेत. अनेक झाडांचा केवळ सांगाडा राहिला आहे. एकीकडे महापालिका झाडे लावून ती जगवण्यासाठी करोडो रुपये खर्च करताना दुसरीकडे मात्र, राडारोड्याच्या डोंगरात ही झाडे गाडून ती मारली जात आहेत. पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून उघड्यावर, नदीपात्रालगत, मैदानावर कचरा, राडारोडा टाकला म्हणून नागरिकांवर दंडात्मक कारवाई करते. काही जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. वाहनांचे परवाने कायम रद्द करावे म्हणून आरटीओकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. मात्र, महापालिकेने जागा देऊन राडारोड्याचा डोंगर तयार केल्याने त्यांच्यावर दंड लावून कोण कारवाई करणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, महापालिका पर्यावरण विभागाने शहरातील राडारोडा टाकण्यासाठी प्राथमिक स्तरावर आठ ठिकाणे निश्चित केली. पण, त्या ठिकाणावर क्षमतेपेक्षा अधिक राडारोडा टाकला जात आहे. आता तर जागादेखील पुरेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. पालिकेने राडारोड्यावर मोशीत शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करण्यास प्लॅंट टाकला आहे. त्यामुळे हा राडारोडा कधी उचलणार आणि ती जागा केव्हा रिकामी करणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

इथे टाकतात राडारोडा

महापालिका हद्दीत 'अ' प्रभागात निगडी पोलीस स्टेशनजवळ, 'ब' प्रभागात मस्के वस्ती रावेत, 'क' प्रभागात कचरा संकलन केंद्र गवळी माथा, 'ड' प्रभागात व्हिजन माॅलजवळ महामार्ग वाकड, 'इ' प्रभागात च-होली स्मशानभूमीजवळ, 'फ' प्रभागात अंकुश चौक स्पाईन रोड यमुनानगर, 'ग' प्रभागात थेरगाव स्मशानभूमीजवळ आणि 'ह' प्रभागात दापोडी रेल्वे स्टेशनजवळ अशा प्रकारे आठ ठिकाणी राडारोडा संकलित केंद्र तयार केलेली आहेत

सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

नागरी भागात राडारोडा संकलन केल्याने धुळीने नागरिकांचे आरोग्य धोकादायक बनले आहे. राडारोडा ठिकाण हे महापालिकेने बिल्डरधार्जिण्या कारभाराचा उत्तम नमुना आहे. रावेतमधील बिल्डर लॉबीच्या राडारोड्याने नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे. भोंडवे बाग समोर बांधकामाचा राडारोडा टाकण्यासाठी जागा दिल्याने बिल्डरांची चांगलीच सोय झाली. पण त्या ठिकाणी सिमेंटचा डोंगर तयार झाला आहे. उंच अशी झाडे खुलेआमपणे जिवंत गाडली जात आहेत  नागरिकांसह लहान मुलांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर तयार झाला आहे. एकीकडे पर्यावरणाचा विषय ज्वलंत बनत आहे. हवेची पातळी खालावत आहे. पण, पालिकेच्या आशीर्वादाने रावेतमध्ये जिवंत झाडे गाडून टाकून जिवंत झाडांची क्रूर हत्या करत आहेत. महाराष्ट्र राज्य (शहरी क्षेत्र) वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५. थेट उल्लंघन करत आहे. तरी संबंधित लोकांवर कडक कारवाई करून महानगरपालिकेने गाडलेली झाडे तत्काळ खुली करावी, असा आग्रह रावेत येथील पर्यवर्णप्रेमी नागरिक अमोल कालेकर यांनी धरला आहे.

महापालिकेने शहरातील नागरिकांना राडारोडा टाकण्यास आठ जागा निश्चित केलेल्या आहेत. त्या ठिकाणहून मोशीतील कचरा डेपो राडारोडा प्रक्रिया केंद्र नेला जातो. त्यामुळे रावेतच्या राडारोडा ठिकाणची पाहणी केली आहे. तो राडारोडा तत्काळ उचलून जागा रिकामी करण्याचा सूचना विभागातील कर्मचा-यांना दिल्या आहेत.
- संजय कुलकर्णी,सह शहर पर्यावरण विभाग, महापालिका  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest