मुळा नदीला जलपर्णीने घातला विळखा
विकास शिंदे -
मुळा नदीतील वाढलेल्या जलपर्णीमुळे बोपखेल परिसरातील नागरिक त्रस्त झाले. जलपर्णीच्या विळख्यात निर्माण होणाऱ्या डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांना आरोग्याच्या चिंताजनक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मुळा नदीतील वाढलेल्या जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणावर डास झाले आहेत. डासांच्या उपद्रवाने बोपोडी, सांगवी, पिंपळे गुरव, बोपखेल या सर्व परिसरातील सुमारे २५ ते ३० हजार नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांमुळे लोकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रार करूनही प्रशासन याबाबत तोडगा काढत नाही.
बोपखेल रामनगर, गणेशनगर भागात मुळा-मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचलेली आहे. या जलपर्णीने अनेक साथीचे रोग बोपखेल व उपनगरांमधील नागरिकांना होत आहे. नदी पात्राची दुर्दशा झाली असून खेळाच्या एखाद्या मैदानाप्रमाणे झाली आहे. महापालिकेतील हद्दीतील बोपखेल हे शेवटच्या ठिकाणी गाव असल्याने अनेक विकास कामे रखडली आहेत. कमीत कमी आरोग्याच्या दृष्टीने तरी बोपखेल मुळा-मुठा नदीच्या पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी सुरुवात करावी.
मुळा-मुठा नदीपात्रालगत असलेल्या गावांमध्ये सांडपाणी, मैलापाणी, औद्योगिक कंपन्यांचे रसायनमिश्रित पाणी, तसेच राडारोडा, कचर्यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले आहे. नदीतून सध्या पाणी वाहात नसल्याने ते एकाच ठिकाणी साचून राहात आहे. त्यातच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याने पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. नदीपात्रातील जलपर्णी काढण्याची नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. जलपर्णी काढण्यास प्रशासनाला मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा ग्रामस्थांकडून निषेध केला जात असून जलपर्णी काढण्याचा मुहूर्त बघण्यासाठी आयुक्तांना पंचांग भेट देण्यात येणार असल्याचे नागरिक सांगत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत बोपखेल शेवटच्या टोकाचे गाव, त्यामुळे विकास कामात नेहमी आमच्या गावाला डावलले जाते. आता मुळा-मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचलेली आहे. या जलपर्णीने अनेक साथीचे रोग उद्भवून नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे किमान आरोग्याच्या दृष्टीने तरी जलपर्णी तातडीने काढावी, मच्छराच्या तावडीतून नागरिकांची सुटका करावी.
- भाग्यदेव घुले, सामाजिक कार्यकर्ते
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.