मुळा नदीतील जलपर्णीचा विषय अखेर मार्गी - 'सीविक मिरर'च्या वृत्ताची घेतली दखल, पालिकेकडून जलपर्णी काढण्यास प्रारंभ
विकास शिंदे
महापालिका हद्दीतील बोपखेल गावच्या मुळा नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जलपर्णी वाढल्याने डासांचा उपद्रव होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत बुधवारी (दि.२२) मुळा नदीला जलपर्णीचा विळखा म्हणून वृत्त प्रसिध्द होताच महापालिका आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेऊन गुरुवारी (२३ मे) रोजी मुळा नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बोपखेल ग्रामस्थांनी 'सीविक मिरर'चे आभार मानले आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बोपखेल मुळा नदीतील वाढलेल्या जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रार्दुभाव वाढला होता. डासांच्या उपद्रवाने बोपखेल परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांमुळे लोकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रार करूनही प्रशासन याबाबत तोडगा काढत नव्हते. बोपखेल रामनगर, गणेशनगर भागात मुळा - मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचलेली होती. या जलपर्णीने अनेक साथीचे रोग बोपखेल व उपनगरांमधील नागरिकांना होत आहे. नदीपात्राची दुर्दशा झाली असून खेळाच्या एखाद्या मैदानात प्रमाणे झाली आहे, बोपखेल या मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी सुरुवात करावी. नदीतून सध्या पाणी वाहात नसल्याने ते एकाच ठिकाणी साचून राहात आहे. त्यातच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याने पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. नदीपात्रातील जलपर्णी काढण्याची नागरिकांकडून महापालिकेच्या 'ई' क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त राजेश आगळे यांच्याकडे तक्रारी करण्यात आली. मात्र, 'ई' क्षेत्रीय प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. दरम्यान, बोपखेल मुळा नदीतील जलपर्णीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त सीविक मिररमध्ये प्रसिध्द होताच ई क्षेत्रीय कार्यालयाकडून दखल घेऊन गुरुवारी आरोग्य विभागाकडून तत्काळ मुळा नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे.
येत्या आठ दिवसांत मुळा नदीतील सर्व जलपर्णी काढून घेण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले.
बोपखेल मुळा- मुठा नदीत जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली होती. एखाद्या खेळाच्या मैदानात प्रमाणे नदीचे पात्र तयार झाले होते. जलपर्णी वाढल्याने परिसरात दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला होता. नागरिकांना डेंगू व इतर संसर्गजन्य आजारासह थंडी-तापाचे अनेक रुग्ण वाढू लागले होते. त्यामुळे नदीतील जलपर्णी तत्काळ काढण्यात यावी म्हणून प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे.
- शशिकांत घुले, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.