भर उन्हात प्रवाशांना उतरवून सीएनजी भरण्याचा प्रताप
पंकज खोले
प्रवासात मार्गस्थ असताना अचानक आगारात आल्यानंतर बसमधून प्रवाशांना भर उन्हात खाली उतरवले जाते. कुणाला काही काळाच्या आतच वाहकाकडून संदेश दिला जातो. त्यानंतर प्रवाशांना लक्षात येते की, सीएनजी भरण्यासाठी ती थांबली आहे. पुढील दहा ते पंधरा मिनिटे वाया जाणार, या संतप्त प्रतिक्रियानंतर प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. अशाप्रकारे एक-दोन नव्हे तर, तब्बल ६० ते ७० बसमधील प्रवाशांना दरररोज हा अनुभव घ्यावा लागतो आणि भर उन्हात ताटकळत बसण्याची वेळ त्यांच्यावर येते.
नेहरूनगर संत तुकाराम पीएमपी (PMP) आगारात सीनजी पंपावर गॅस भरायला दिवसभर बसच्या रांगा लागतात. शहरातील एकमेव पंप असलेल्या या ठिकाणी दिवसभर जवळपास २५० हुन अधिक बसमध्ये सीएनजी भरला जातो. बसच्या क्षमतेनुसार कधी ८० तर कधी ९० किलोमध्ये तो भरला जातो. मात्र, अनेकवेळा येथील ताण वाढला असून, पर्यायी वर्गाची व्यवस्था करण्याची मागणी वाहक व चालकांकडून होत आहे. या आगारात एकमेव सीएनजी गॅस पंप असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच आगारातील बस सीएनजी भरण्यासाठी नेहरूनगर आगारात येतात. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या बस या दुपारी सीएनजी भरण्यासाठी येत असतात. त्यामुळे आगारातील पंपावर मोठी गर्दी होत आहे. लवकरच आपल्या ठिकाणी पोहचू या विश्वासाने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना बराच वेळ आगारात बसमध्ये गॅस भरेपर्यंत वाट पाहत उभे रहावे लागते आहे. त्यामुळे अनेकजण वाहकांशी वाद देखील घालतात.
सीएनजी हा ज्वलनशील गॅस असल्याने बसमधील प्रवाशांना बसमधून खाली उतरून आगाराच्या बाहेर रस्त्यात पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. अशी समस्या रोजचीच असल्याचे प्रवाशांनी सांगितले. पुणे शहरात ४ ते ५ पंप असून, पिंपरी-चिंचवडमध्ये नेहरुनगर असे फक्त एकच सीएनजी पंप आहे.
तिसरा पंप कधी सुरु करणार?
सध्या आगारात दोन सीएनजी पंप आहेत. ते कमी पडत असल्याने आणखी एक पंप बसवण्यात आला आहे. पण, तो अद्याप सुरू केला नाही. त्यामुळे इतर दोन पंपवर ताण येत आहे. तिसरा पंप लवकर सुरू करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
महत्वाच्या कामासाठी बाहेर पडलो होतो. मात्र, नेहरुनगर आगारात बस सीएनजी गॅस भरायला थांबली. त्याची माहिती नसल्याने अर्धा तास वेळ वाया गेला. कडक उन्हामुळे बसची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.
-रमेश कांडगे, ज्येष्ठ नागरिक, मोशी
मला भोसरी येथे मुलाखतीला जायचे होते. मात्र येथे बस थांबवण्यात आली. उशीर होत असल्याने तेथून पुढे रीक्षाने जावे लागले. त्यात अर्धा ते पाऊण तास वाया गेला.
-रजनीश करडे, युवक
बहुतांश बसमध्ये रात्रीच्या वेळेस सीएनजी भरून ठेवला जातो. मात्र, लांब पल्ल्याच्या बसला पर्याय नसतो. त्यामुळे त्या-त्यावेळी सीएनजी भरणे अनिवार्य ठरते. तरी, त्याबाबत प्रवाशांना अगोदर कल्पना द्यावी, अशा सूचना वाहकांना देण्यात येणार आहेत.
-भास्कर दहातोंडे, आगार प्रमुख तथा मुख्यालय-२ प्रमुख, पीएमपीएमएल
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.