Pimpri Chinchwad : सांगा, आम्ही चालायचे कुठून?; शहरातील फूटपाथवर वाहनांची अनधिकृत पार्किंग, विद्युत डीपीमुळे अडथळा

शहरातील विविध भागात फूटपाथवर अवैधरित्या गाड्या लावल्या जात आहेत. नव्याने बनवलेल्या सायकल ट्रॅकवर देखील वाहने पार्क करण्यात येत आहेत, तर अनेक ठिकाणी फूटपाथवर विद्युत डीपी, ट्रान्सफाॅर्मर जागोजागी दिसून येत आहेत.

Pimpri Chinchwad :  सांगा, आम्ही चालायचे कुठून?; शहरातील फूटपाथवर वाहनांची अनधिकृत पार्किंग, विद्युत डीपीमुळे अडथळा

सांगा, आम्ही चालायचे कुठून?; शहरातील फूटपाथवर वाहनांची अनधिकृत पार्किंग, विद्युत डीपीमुळे अडथळा

शहरातील विविध भागात फूटपाथवर अवैधरित्या गाड्या लावल्या जात आहेत.  नव्याने बनवलेल्या सायकल ट्रॅकवर देखील वाहने पार्क करण्यात येत आहेत, तर अनेक ठिकाणी फूटपाथवर विद्युत डीपी, ट्रान्सफाॅर्मर जागोजागी दिसून येत आहेत. त्यामुळे पादचारी नागरिकांना चालण्यास आणि सायकल चालवण्यास अडथळा निर्माण होऊ लागला आहे.  (PCMC) 

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत अर्बन डिझाइन प्रारूपाच्या धर्तीवर रस्त्याचे पुननिर्माण करणे सुरू आहे. त्यात तयार होणाऱ्या फूटपाथ व रस्ता यात जेमतेम सहा इंचांचा फरक आहे. त्यामुळे फूटपाथवर वाहन सहज चढवता येते. सोसायटी बाहेर वाहने लावणारे नागरिक आता त्यांची वाहने फूटपाथवर पार्क करत आहेत.

शहरातील केएसबी चौक ते कुदळवाडी चौकापर्यंत दोन्ही बाजूला पदपथ, सायकल ट्रॅक निर्माण केले आहेत. फूटपाथलगत वाहन पार्किंग व्यवस्था केलेली आहे. मात्र, नागरिकांनी फूटपाथवर अवैधरित्या गाड्या लावण्यास सुरुवात केलेली आहे. अनेक सोसायट्यांच्या बाहेर दिवसभर वाहने फूटपाथवर पार्क केलेली दिसून येत आहेत. शहरातील अनेक रस्ते आणि पदपथदेखील वाहनांनी केलेल्या पार्किंगमुळे हरवलेले आहेत. 

काही रस्त्यांवरील पदपथावर किरकोळ व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी मार्ग उरलेला नाही. अर्बन डिझाइन कामामुळे रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे, तर फूटपाथ मोठे झाले आहेत. परिणामी, फूटपाथ नागरिकांना चालण्यास बनवले असताना त्यावर केवळ वाहने पार्किंग करण्यात येऊ लागली आहेत. काही ठिकाणी विद्युत ट्रान्सफाॅर्मर, विद्युत डीपी अडथळे ठरू लागले आहेत.

दरम्यान, शहरातील अनेक रस्त्यांचे सायकल मार्ग, पदपथ आणि रस्ता असे विभाजन करण्यात आले होते. मात्र, सध्या अतिक्रमणांमुळे सायकल मार्ग देखील सायकल चालकांना वापरता येत नाही. 

अनेक हॉटेल, व्यावसायिकांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने ग्राहक रस्त्यावर किंवा पदपथावर वाहने लावतात. यामुळे फूटपाथवर जागाच उरली नसून आम्ही चालायचे कोठून, असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.

पार्किंग धोरणास हरताळ

शहरातील विस्तृत फूटपाथवरील पार्किंग व अतिक्रमणे हा कायमचा गंभीर विषय आहे. अनेक भागात फूटपाथवर गाड्या, अतिक्रमणे, व्यावसायिकांची अतिक्रमणे, ‌टपऱ्या यामुळेच प्रशस्त फूटपाथ हे पार्किंग स्पाॅट झाले आहेत. सोसायटीसह अन्य भागात राहणा-यांना वाहनांना पार्किंग मिळत नाही. 

त्यासाठी फूटपाथवर शक्य तेथे पार्किंग करत आहेत. महापालिकेने सशुल्क पार्किंग धोरण राबवले, पण वाहन चालकांना वेसण घालण्याचा अद्यापही प्रयत्न केलेला नाही. यामुळे नागरिक चुकीचे पार्किंग करू लागले आहेत.

पदपथांची जबाबदारी कोणाकडे आहे, हे महापालिकेने एकदा स्पष्ट करावे. नवीन बांधलेले पदपथ लगेच कसे खराब होतात? पदपथावर वाहने पार्क करतात, सायकल ट्रॅक वाहने लावतात. पदपथ स्वच्छ व चालणाऱ्यांसाठी मोकळे राहतील याची जबाबदारी महापालिकेची नाही का?

-अनिकेत बाबर, सामाजिक कार्यकर्ता

पादचाऱ्यांचा विचार करणारे प्रशासन नसणे हे आपले मोठे दुर्दैव आहे. काही वाहनचालक विरुद्ध दिशेने येतात, त्या वेळी चालणाऱ्यांचे काय हाल होतात, पदपथ नागरिकांसाठी चालण्यायोग्य राहतील याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. हॉटेल किंवा व्यावसायिकांनी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी. पार्किंगच्या जागेत अनधिकृत व्यवसाय बंद करावेत, यासाठी महापालिकेने मोहीम राबवावी. सर्वसामान्य जनतेचा विचार करावा.  

- नीलेश सुंभे, रहिवासी नागरिक

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest