पिंपरी-चिंचवड: शहरातील 'आरएमसी प्लँट'चे लवकरच सर्वेक्षण
विकास शिंदे
पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात शेकडो बांधकाम व्यावसायिक हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लॅंट सुरू करत आहेत. यामध्ये पुनावळेतील सोमानी टॉवर्स आणि चिखलीतील 'ऐश्वर्यम हमारा' या दोन्ही गृहप्रकल्पांचे आरएमसी प्लॅंट हे विनापरवानगी पाच ते सात वर्षे सुरू होते. याकडे महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे देखील दुर्लक्ष होते. त्यामुळे महापालिकेने ते दोन्ही प्लॅंट बंद केले आहेत. यापुढे पर्यावरण विभागाकडून लवकरच शहरातील आरएमसी प्लॅंटचे सर्वेक्षण हाती घेणार असून कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. (PCMC RMC Plants)
शहरात रहिवासी भागात शेकडो बांधकाम व्यावसायिकांनी रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लॅंट उभा केलेले आहेत. या भागातील आएमसी प्लॅंटबाबत तेथील नागरिकांच्या वायू व ध्वनिप्रदूषणावर महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे तक्रारी येऊ लागल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आरएमसी प्लॅंटच्या कागदपत्रांची पर्यावरण विभाग पथकाकडून पडताळणी केली असता त्या बांधकाम व्यावसायिकांकडे प्लॅंट सुरू करण्यासाठी अनिवार्य कागदपत्रे नसल्याचे आढळून आले आहे.
शहरातील आरएमसी प्लॅंटमधून मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा आणि त्या प्रकल्पामधून निघणाऱ्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत असल्याच्या पालिकेच्या पर्यावरण विभागास पुनावळे, ताथवडे, वाकड, किवळे, मोशी, च-होली, चिखली, पिंपळे निलख या परिसरातून तक्रारी प्राप्त होत आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने मे. एस.व्ही.टी.एन.कंन्स्ट्रक्शन प्रा.लि. तर्फे सोमानी टॉवर्स, पुनावळे, ऐश्वर्यम हमारा, चिखली येथे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आणि महापालिकेचे ना-हरकत दाखला, इतर अनुषंगिक आवश्यक असणारी परवानगी घेणे अनिवार्य असते. परंतु कागदपत्र पडताळणीत त्या व्यावसायिकांनी कोणतीही परवानगी घेतली नसून अनधिकृतपणे व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. त्यामुळेच महापालिकेने दोन्ही आरएमसी प्लॅंट कायमस्वरूपी बंद केले आहेत.
शहरात गृहनिर्माण प्रकल्पामुळे सर्वत्र ‘आरएमसी’ प्लॅंट कार्यरत आहेत. त्यामुळे होणाऱ्या ध्वनी व वायुप्रदूषणामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर महापालिकेने केलेल्या पाहणीत हे प्लॅंट विनापरवाना चालू असल्याचे उघडकीस येत आहे. महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे आरएमसी प्लॅंट सुरू आहेत. शहरात महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केवळ ४० आरएमसी प्लॅंटला 'ना हरकत' दाखला दिलेला आहे. पण, क्षेत्रीय कार्यालयाकडून किती दाखले दिले यांची आकडेवारी उपलब्ध नाही. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर देखील अनेक आरएमसी प्लॅंट शहरात अद्यापही सुरू आहेत. पण, याची कोणतीही नोंद महापालिकेकडे नाही.
दरम्यान, वायू आणि ध्वनिप्रदूषणाबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून शहरात लवकरच आरएमसी प्लॅंटचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच बिल्डरांनी महापालिका पर्यावरण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून 'ना हरकत' दाखला घेतला का, तसेच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनदेखील अनुषंगिक परवानगी घेण्यात आलेल्या आहेत का, याविषयी कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे बिल्डरांचे धाबे दणाणले आहे.
महापालिकेची एनओसी बंधनकारक
महापालिका हद्दीत ‘आरएमसी’ प्लॅंट सुरू करण्यासाठी बिल्डरला महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे अर्ज दाखल करून 'ना हरकत' दाखला घेणे बंधनकारक आहे. पर्यावरण कर्मचाऱ्यांकडून स्थळ पाहणी करून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले जाते. जून २०२३ नंतर क्षेत्रीय कार्यालयाकडून एनओसी दिली जात आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या प्लँटला परवानगी आवश्यक आहे. त्यानुसार शहरात ४० आरएमसी प्लॅंटला एनओसी दिलेली आहे. त्यामुळे शेकडो बिल्डरांकडे सुरू असलेले आरएमसी प्लॅंट विनापरवानगी सुरू असल्याचे निर्दशनास येत आहे.
"महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे बांधकाम व्यावसायिकांना आरएमसी प्लॅंट सुरू करण्यासाठी एका वर्षाकरिता 'ना हरकत' प्रमाणपत्र दिले जाते. आरएमसी पुन्हा सुरू ठेवायचा असेल पुन्हा प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. पर्यावरण विभागाकडून ४० 'ना हरकत' दाखले दिलेले आहेत. विनापरवानगी सुरू असलेल्या आरएमसीचे सर्वेक्षण करून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यापुढे विनापरवाना व्यवसाय करत वायू - ध्वनिप्रदूषण केल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे."
- संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.
"शहराच्या चारही बाजूने गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक हे आरएमसी प्लॅंट उभारून सुरू करत आहे. ते प्लॅंट उभे करताना आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, आरएमसी प्लॅंट उभा करून ते चोवीस तास सुरू ठेवत वायू आणि ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून सर्रासपणे उल्लंघन होत आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. आरएमसी प्लॅंट ना महापालिकेचे, ना एमपीसीबी नियंत्रण नसल्याने नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे वायू व ध्वनिप्रदूषण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे."
- डॉ. चंद्रशेखर पवार, पर्यावरणप्रेमी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.