संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
निवडणुकीच्या कामांचा अतिरिक्त भार असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षकांची उन्हाळी सुट्टी शाळाबाह्य कामातच जाणार आहे. महापालिकेचे एकूण १ हजार ३०० शिक्षक या कामात व्यस्त आहेत. पिपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागांतर्गत १ हजार ३०० शिक्षकांचा समावेश होत आहे. या शिक्षकांना सध्या निवडणूक कामात गुंतवण्यात आले आहे. एप्रिल आणि में महिना उन्हाळी सुट्टयांचा असतो.
शैक्षणिक वर्ष संपते ना संपते तोच लोकसभा निवडणूक प्रशिक्षण, शाळेचा पट वाढीसाठी विद्यार्थी 'शोधा शोध' सुरू होणार आहे. त्यात भरीत-भर म्हणून पॅट परीक्षेचा निकाल ऑनलाइन भरण्याची नवी डोकेदुखी सुरू झाली आहे. त्यामुळे शिक्षकाची या कामामध्ये पुरती दमछाक झाल्याचे पहायला मिळत आहे. या वर्षी दोन महिन्यांची उन्हाळी सुटी मिळणार, अशी आशा शिक्षकांना होती. मात्र या स्वप्नावर पाणी फिरले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण, निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. या बरोबरच शाळेच्या निकालाची तयारी व निवडणूक ड्यूटीमध्ये १५ एप्रिल ते ८ मे हा काळ जाणार आहे. त्यानंतर शाळेचा पट वाढवण्यासाठी पालकांचे उंबरे झिजवण्यासाठी १० दिवस जाणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना नापास करण्याच्या निर्णयामुळे शिक्षकाची त्रेधातिरपिट उडणार आहे.
कारण इयत्ता पाचवी आणि आठवीचा निकाल हा वेगळा लावावा लागणार आहे. यात विद्यार्थी नापास झाला, तर त्याला मार्गदर्शन करून दोन महिन्यानी पुन्हा परीक्षा घ्यावी लागणार आहे. या सुटीतील कामाच्या बोजात शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या पास- नापासची पडलेली चिंता आहे. यंदा पॅट परीक्षेची माहिती ऑनलाइन भरण्याची सक्ती करण्यात आली होती. यामधील तांत्रिक बाबी समजून घेण्यात शिक्षकांचे ५ ते १० दिवस गेले. या कामाच्या व्यापात शिक्षकांकडे केवळ आठच दिवसांची सुटी उरणार आहे. उन्हाळ्याच्या सुटीत अतिरिक्त कामाच्या बोजाने शिक्षकांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. या सर्व कामाच्या ताणामुळे शासनाच्या या राबवलेल्या धोरणामुळे शिक्षकांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे एकूण १ हजार ३०० शिक्षक आहेत. सध्या निवडणुकीचा कार्यक्रम राबविला जात आहे. या कामासाठी प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही विभागाचे शिक्षक कार्यरत आहेत.
- विजयकुमार थोरात,सहायक आयुक्त, शिक्षण विभाग
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.