पालखी मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणांचा आयुक्तांनी घेतला आढावा
आषाढीवारी पालखी सोहळ्याची स्वागत तयारी, मुक्काम स्थळासह पालखी मार्गावर आयुक्त राहुल महिवाल यांनी आढावा घेतला. वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची संपूर्ण तयारी महापालिकेकडून करण्यात आली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे शहरात आगमन होते. दोन्ही पालखी सोहळा स्वागत कक्ष, मुक्कामाचे स्थळ, विसावा स्थळ, पालखी मार्गावर प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंबासे, उपआयुक्त रविकिरण घोडके, मनोज लोणकर आदी कर्मचारी उपस्थित होते. निगडी येथील भक्ती - शक्ती चौकात स्वागत कक्ष, आकुर्डी विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्काम, महापालिका शाळेतील दिंड्यांचा मुक्काम, खराळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नाशिक फाटा रोड, दापोडी येथील पालखी विसावा आदी ठिकाणीही त्यांनी पाहणी केली. (Wari 2024)
पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. विविध ठिकाणी दिशादर्शक फलक दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक केली आहे. पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधेसाठी रुग्णवाहिका, पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरते शौचालयांची व्यवस्था केली आहे. पालखी मार्गावर पाणी कोठेही तुंबणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. सर्व खड्डे बुजवण्यात येत आहेत. पार्किंगच्या जागा, सर्व सुविधांसंदर्भातील फलक लावण्यात येणार आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी कंट्रोल रूम उभारण्यात येणार आहे.
मुक्कामाच्या ठिकाणी रस्त्यावरील तसेच पालखी मार्गावरील राडारोडा उचलण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. पालखी मार्गावर व कार्यक्रमांच्या ठिकाणी, मुक्कामाच्या व विसाव्याच्या ठिकाणी साफसफाई, जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर तसेच मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशिन ठेवण्यात येणार आहेत. तसेच पालखी सोहळा कालावधीत वारकऱ्यांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात मोफत वैद्यकीय सुविधा २४ तास उपलब्ध करून देण्यात येणार असून फिरता दवाखानाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पालखी मुक्काम, विसावा, स्वागत कक्ष आणि पालखी मार्गावर योग्य त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.