संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड एसटी आगाराला १२ नव्या बसेसची गरज असताना, केवळ एक नवी बस दिली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरानी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाची डिझेल बस वल्लभनगर आगारात दाखल झाली आहे. ही पहिली बीएस ६ बस असणार आहे. तामिळनाडूस्थित कारखान्यात अशोक लेलँड कंपनीने या बसची बांधणी केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने पिंपरी ते नाशिक या मार्गावर पहिली फेरी सोडण्यात आली होती. तरी नव्या बसची आणखी प्रतीक्षा आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अनेक बस १५ वर्षे जुन्या झाल्या आहेत. डिझेल बसपैकी पहिल्या टप्प्यात ५० बस येणार आहेत. खिळखिळ्या झालेल्या बस मार्गावर सोडल्यामुळे या बस प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे, तसेच अपघाताचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे महामंडळाने ताफ्यात नवीन बस घेण्याचा निर्णय घेतला होता. खासगी पाच हजार इलेक्ट्रिक बस आणि स्वमालकीच्या अडीच हजार डिझेल बस घेण्यात येणार आहेत.
इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्याने दाखल होत आहेत. तसेच स्वमालकीच्या अडीच हजार पहिल्या टप्प्यातील बस आगारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यातील पहिली बस २० ऑक्टोबरला दापोडी येथील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत दाखल झाली होती. या बसची पिंपरी चिंचवड आरटीओकडून पासिंग झाल्यानंतर बुधवारी ही बस वल्लभनगर आगारात दाखल झाली. बुधवारपासून ही बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरासाठी सद्यस्थितीमध्ये नव्या 12 एसटी बसची गरज आहे. दिवाळीत त्या ताफ्यात येतील असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षामध्ये एकच बस देऊन पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा एकदा दुजाभाव दिला असल्याचे दिसून आले आहे. या पूर्वी देखील मागणी करूनही नव्या बस देण्यात आल्या नव्हत्या. त्यानंतर दिवाळीत मुहूर्त काढण्यात आला. मात्र, केवळ एकच बस देण्यात आली असल्याने प्रवासी संघटनेने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
पिंपरी चिंचवड आगारासाठी आणखीन काही बसेस येत्या काही दिवसात दाखल होतील. एकूण पंधरा गाड्या नव्याने मिळणार आहेत. त्यातील पहिली गाडी दिवाळीमध्ये मिळाली आहे. इतर गाड्यांबाबत पाठपुरावा सुरू आहे.
- प्रमोद नेहूल, विभागीय नियंत्रक, पुणे विभाग (एसटी)