पिंपरी-चिंचवड: खासदाराच्या मुलाने स्वतःहून काढले अनधिकृत होर्डिंग
विकास शिंदे-
वादळी वाऱ्याने अनधिकृत होर्डिंग कोसळून जीवित व वित्तहानी होऊ लागली होती. त्यावर महापालिकेने अनधिकृत होर्डिंगवर धडक कारवाई सुरू केली. मंगळवार (२१ मे) महापालिकेने चार अनधिकृत होर्डिंग हटवले. तर ९ अनधिकृत होर्डिंग त्या मालकांनी स्वतःहून काढून घेतले आहेत. यामध्ये थेरगावमधून विद्यमान खासदाराच्या मुलाने स्वतःहून होर्डिंग काढून घेतले तर चिंचवडमधून राष्ट्रवादी माजी नगरसेवकाच्या मुलाच्या अनधिकृत होर्डिंग कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. यात शहर परिसरातील अनधिकृत २४ होर्डिंग्ज सापडले होते. त्यांना नोटीस देत निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अधिकृत जाहिरात फलक किंवा होर्डिंग लावताना फलकाच्या शेवटी नागरिकांसाठी सूचना लिहिणे गरजेचे आहे.
या सूचनांचा नमुना महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या वतीने फलकधारकांना देण्यात येईल. होर्डिंगच्या खाली टपरी, दुकान किंवा अतिक्रमण केले गेले तर त्याबाबत फलकधारक किंवा जागामालकांनी महापालिकेस कळवणे आवश्यक आहे. महापालिका संबंधित दुकान, टपरी किंवा अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेने अनधिकृत जाहिरात फलक निष्कासनाची कारवाई सुरू केली. मंगळवारी ४ अनधिकृत फलकांवर निष्कासनाची कारवाई केली, तर ९ फलकधारकांनी स्वत: प्रशासनाला सहकार्य करत त्यांचे अनधिकृत फलक काढून घेतले आहेत. या कारवाईदरम्यान सह-आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त संदीप खोत, कार्यालय अधीक्षक ग्यानचंद भाट, परवाना निरीक्षक, मजूर, एमएसएफ जवान तसेच महापालिका सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
१३ अनधिकृत होर्डिंग हटविले
मंगळवारी (२१ मे ) झालेल्या कारवाईत एकूण १३ अनधिकृत फलक हटविण्यात आले असून त्यातील ९ फलक स्वत: फलकधारकांनी हटवले आहेत. यामध्ये नवीन भक्ती शक्ती मुकाई चौक रस्ता येथील ४०x१० चा फलक, शनि मंदिर रोड वाकड येथील १५x१५ चा फलक, बापुजी बुआ नगर मुंबई बेंगलोर हायवे साई पेट्रोल पंप येथील १० बाय १० चा फलक, भक्ती-शक्ती चौक निगडी येथील ३० बाय २० चा फलक, यश साने पेट्रोल पंपाशेजारील बालाजी फर्निचर चिखली येथील २० बाय २० चा फलक, शेलार वस्ती देहू आळंदी रोड तळवडे येथील २० बाय २० चा फलक, सत्संग रोड सोनवणे वस्ती चिखली येथील ३० बाय २० चा फलक, मंगल नगर आयवाना बिल्डिंग थेरगाव येथील २०x२० चा फलक म्हाडा प्रकल्प पूना-मुंबई हायवे ताथवडे येथील फलक अशा एकूण ९ फलकांचा समावेश आहे. तसेच महापालिकेकडून ४ फलकांमध्ये कातळे वस्ती रावेत किवळे येथील ३० बाय २० चा फलक, तत्वन कन्स्ट्रक्शन कातळे वस्ती रावेत येथील ३० बाय २० चा फलक, जयवंत प्लाझा भोईर उड्डाणपुलाजवळ चिंचवड येथील ३० बाय ३० चा फलक, सत्संग रोड चिखली येथील २० बाय २० चा फलक असे मिळून ४ फलक निष्कासित करण्यात आले.
शहरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या वतीने अनधिकृत जाहिरात फलक निष्कासनाची कारवाई सुरू असून आज एकूण ४ अनधिकृत फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच ९ फलकधारकांनी स्वत: प्रशासनाला सहकार्य करत त्यांचे अनधिकृत फलक हटवले
- शेखर सिंह, आयुक्त,पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.