संग्रहित छायाचित्र
पंकज खोले
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागातून शहरात विविध उद्योग व्यवसायांना परवाने आणि 'ना हरकत' प्रमाण देण्यात येतात. या परवाने आणि 'ना हरकत' प्रमाणपत्रावर एका महिला लिपिकाने विभाग प्रमुख असलेल्या उपायुक्तांच्या बनावट सह्या मारून आर्थिक अपहार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आकाशचिन्ह व परवाना विभागात शहरातील छोटे - मोठे उद्योग, व्यवसाय परवाने दिले जातात. शहरातील पेट्रोल पंपासह व्यवसायांना साठा परवाना दिला जातो. त्याशिवाय विविध भंगार व्यावसायिकांना देखील उद्योग-व्यवसाय परवाने दिले जात आहेत. त्यानुसार हजारो उद्योग व व्यावसायिकांना हे परवाने घेणे बंधनकारक आहे. सदरचे उद्योग, व्यवसाय परवाने आणि 'ना हरकत' प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी लिपिक असलेल्या महिला लिपिकांकडे दिली होती. तत्कालिक साहाय्यक आयुक्तांनी त्या महिलेला उद्योग-व्यवसाय परवाना निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. त्यामुळे शहरातील विविध आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व उद्योग, व्यावसायिकांना परवाने, नूतनीकरण, 'ना हरकत' प्रमाणपत्र हे संबंधित महिला लिपिकांकडून दिले जात होते.
याच संधीचा आणि दिलेल्या अधिकाराचा गैरफायदा घेत संबंधित महिला लिपिकाने शहरातील उद्योग व व्यवसाय परवाने, 'ना हरकत' प्रमाणपत्र देताना आर्थिक तडजोडी करत त्यांनी थेट संबंधित विभाग प्रमुखांकडे सह्या न घेता स्वत:च उपायुक्तांच्या सह्या करत परवाने, 'ना हरकत' दाखले देण्यास सुरुवात केली होती. हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होता. याबाबत महापालिकेचे आकाशचिन्ह व परवाना उपायुक्त संदीप खोत यांच्या बनावट स्वाक्षरी करून त्या लिपिक महिलेने कुदळवाडीतील भंगार व्यावसायिकांना 'ना हरकत' दाखले दिले होते. त्या 'ना हरकत' प्रमाणपत्रावरून व्यावसायिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगी प्रस्ताव पाठवला होता.
दरम्यान, प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे यापूर्वी पाठवलेले परवानगी प्रस्ताव आणि आता पाठवलेल्या प्रस्तावावरील स्वाक्षरीत फरक दिसला. याविषयी संशय आल्याने उपायुक्त संदीप खोत यांना प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानुसार चारही 'ना हरकत' दाखल्यावरील स्वाक्षरी आपण केलेल्या नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी केलेल्या चौकशीत संबंधित विभागातील महिला लिपिकाने बनावट स्वाक्षरी केल्याचे दिसून आले. त्या संबंधित महिला लिपिकाने उपायुक्त संदीप खोत यांच्यासमोर सदरील सह्या मीच केल्याचे कबूल देखील केले आहे. त्यामुळे खोत यांनी याविषयी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडे पत्र पाठवत त्या लिपिकांवर योग्य ती कारवाई करण्याचे पत्र दिले आहे.
उद्योग, व्यवसाय परवान्याचे कामकाज करणाऱ्या महिला लिपिकाने चार 'ना हरकत' प्रमाणपत्रावर माझ्या बनावट सह्या केलेल्या आहेत. सदरील महिलेने सह्या केल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाला पत्र देऊन त्या लिपिकावर योग्य ती कारवाई करावी असे कळवले आहे. तसेच आकाशचिन्ह व परवाना विभागातून त्या महिलेची तत्काळ 'ह' क्षेत्रीय कार्यालयात बदली केलेली आहे.
- संदीप खोत, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका
महिला लिपिकाने उपायुक्तांच्या बनावट सह्या करून 'ना हरकत' प्रमाणपत्र दिले आहेत. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. यापूर्वी त्या महिलेने आणखी किती उद्योग व व्यवसाय परवाने दिले आहेत का? त्यांनी आणखी कोणाच्या सह्या केलेल्या आहेत का? याविषयी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यानुसार संबंधित महिला लिपिकाचे सेवानिलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे ठेवला आहे. आयुक्त शेखर सिंह हे सुट्टीवर आहेत. त्यामुळे ते आल्यानंतर त्या महिला लिपिकावर कारवाई केली जाईल, त्यानंतर विभागीय चौकशी देखील करण्यात येणार आहे.
- विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.