संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
महापालिका (PCMC) हद्दीतील किवळे, ताथवडे, पुनावळे, मोशी परिसरात विनापरवानगी आरएमसी (रेडी मिक्स काँक्रिट) प्लांट सुरु झाले आहे. यामुळे त्या भागात हवा व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे आरएमसी प्लांट तात्काळ बंद करावेत, अशी नोटीस महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून अकरा आरएमसी प्लांटच्या चालकांना देण्यात आली आहे. तसेच पर्यावरण विभागाकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील पत्र देऊन हे आरएमसी प्लांट बंद करुन कडक कारवाई करावी, असे पत्र दिले आहे. त्यामुळे हवा व ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आरएमसी प्लांटवर कधी कारवाई होणार, याकडे पर्यावरण प्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Pimpri Chinchwad Municipal Corporation)
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सारथी वेब पोर्टलवर किवळे, ताथवडे, पुनावळे आणि मोशी भागात आर एम सी प्लांटबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या 'आर एम सी प्लॅंट' मुळे हवा व ध्वनी प्रदूषण होऊ लागले होते. २४ तास सुरु असलेल्या 'आरएमसी प्लांट'ने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन श्वसनांचा त्रास सुरु झाला आहे. सदरचे आर. एम सी प्लांट इतरत्र हलविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. (Pimpri Chinchwad RMC Plants)
ताथवडे, पुनावळे, किवळे आणि मोशी भागात गृहप्रकल्पाची कामे सुरु आहेत. या प्लांटमुळे मोठ्या प्रमाणात हवेत धूळ मिसळून हवा व ध्वनी प्रदूषण वाढले आहे. तेथील परिसरात राहणा-या नागरिकांच्या नागरिकांच्या नाका, तोंडात धूळ जात असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धूळ हवेत जात असल्याने हवा अशुध्द होत आहे. त्यात 'आर एम सी प्लांट' हे रात्र-दिवस सुरु राहिल्याने ध्वनी प्रदुषणदेखील वाढले आहे. या 'आरएमसी प्लांटमुळे लहान मुले, विद्यार्थी, अबालवृध्द ज्येष्ठ नागरिक, महिलासह पुरुषांना श्वसानाचा त्रास वाढला आहे.
तसेच आरएमसी प्लांट चालविणा-यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याचे दिसून आले आहे. हा व्यवसाय ते अनधिकृतपणे चालवित असल्याचे पर्यावरण विभागाच्या निर्दशनास आले आहे. दरम्यान, महापालिकेने किवळे, ताथवडे, पुनावळे आणि मोशी परिसरातील अकरा आरएमसी प्लांट मालकांना नोटीस बजाविली आहे. सदरचे प्लांट नोटीस मिळाल्यानंतर तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शासनाकडील आवश्यक असणा-या सर्व परवानग्या घेऊन पर्यावरणाची हानी होणार नाही. तसेच नागरिकांच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होणार नाहीत. याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन सदरचा प्लांट चालू करण्याची कार्यवाही करावी, तसेच नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसात खुलासा करावा, अन्यथा महापालिका अधिनियम ३७६ अ अन्वये कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पर्यावरण विभागाने दिला आहे.
अनधिकृत प्लांट कित्येक वर्षे सुरु
शहरात गृहप्रकल्पांची संख्या वाढली आहे. त्या प्रकल्पांना रेडी मिक्स काँक्रिट (आर एम सी) हे मटेरियल मिळत आहे. महापालिका हद्दीत आर एम सी प्लांटची संख्या वाढली आहे. सर्वच 'आरएमसी प्लांट हे दिवस - रात्र सुरु असतात. त्यांच्या वाहनाची वर्दळ आणि तेथे मशीनचा कानठळ्या बसवणारा आवाज सुरु असतो. त्यामुळे ताथवडे, पुनावळे, किवळे आणि मोशी भागातील सोसायटीतील नागरिकांना अशुध्द हवा, ध्वनी प्रदूषणामुळे रात्रभर झोपच लागत नाही. त्यामुळे सदरील आरएमसी प्लांटवर तात्काळ कारवाई करुन ते बंद करा, अशी मागणी सोसायटीतील नागरिकांतून जोर धरु लागली आहे.
महापालिका हद्दीत आवश्यक परवानगी न घेता 'आरएमसी प्लांट सुरु असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. तेथील नागरिकांच्या तक्रारीनुसार पर्यावरण विभागाकडून घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदरचे 'आर एम सी प्लांट चालविणा-यांनी शासनाची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचे निर्दशनास आले. अनधिकृत आरएमसी प्लांट चालविणा-या अकराजणांना नोटीस बजावून ते बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पर्यावरण विभागाकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र देवून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- संजय कुलकर्णी - सह शहर अभियंता , पर्यावरण विभाग, महापालिका पिंपरी चिंचवड
हवा व ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशुध्द हवा आणि ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुले, अबालवृध्द ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुषांना श्वसनाचा त्रास होवू लागला आहे. याबाबत महापालिका सारथी वेबपोर्टलवर नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. हे आरएमसी प्लांट बंद ठेवून संबंधितावर कडक कारवाई करावी.
- चंद्रशेखर पवार, पर्यावरण अभ्यासक, पिंपरी चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.