पिंपरी-चिंचवड: झाडांच्या तक्रारीचा ‘२४ तासांत’ निपटारा!

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अति धोकादायक झाडांबाबतच्या तक्रारींचा आता ‘२४ तासांत’ निपटारा होणार आहे. त्यासाठी प्रशासन ‘सारथी’ हेल्पलाईनच्या धर्तीवर नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करणार आहे.

Mahesh Landge

संग्रहित छायाचित्र

खासगी, सोसायटी आवारातील धोकादायक झाडांसाठी पालिकेचे नवे पोर्टल

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अति धोकादायक झाडांबाबतच्या तक्रारींचा आता ‘२४ तासांत’ निपटारा होणार आहे. त्यासाठी प्रशासन ‘सारथी’ हेल्पलाईनच्या धर्तीवर नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी उद्यान विभागाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ऑटो क्लस्टर येथे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेतली. यावेळी नालेसफाई, नागरी आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आदी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसाळा सुरू होत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थान विभाग व नियोजन सक्षम करावे. पहिल्याच पावसात भोसरीतील शांतीनगर, आदिनाथनगर आदी भागात पाणी साचले होते. पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या वाहिन्या अनेक ठिकाणी ‘ड्रेनेजलाईन’ला जोडल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी ‘ ड्रेनेज चोकअप’ होतात. त्यामुळे ‘ड्रेनेज क्लिनिंग व्हेईकल’ची संख्या वाढवावी, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली.
शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये ‘ड्रेनेज क्लिनिंग व्हेईकल’ आहे. तरीही, आपत्तीकाळातील खबरदारी म्हणून महापालिका मुख्यालय येथे आणखी एक ड्रेनेज क्लिनिंग व्हेईकल तैनात करण्याची सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना केली आहे.
    
सोसायटीधारकांना दिलासा
महापालिका हद्दीतील धोकादायक झाडे हटवणे. धोकादायक फांद्यांची छाटणी करणे, अशा तक्रारींसाठी महापालिका उद्यान विभागाची वृक्ष प्राधिकरण समिती कारवाई करीत असते. मात्र, खासगी जागेतील किंवा सोसायटींच्या आवारातील वृक्षांच्या छाटणीसह अन्य तक्रारींबाबत महापालिका प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी घेण्याबाबतच्या प्रक्रियेबाबत अज्ञान किंवा तांत्रिक अडचणींमुळे झाडे तोडण्यात अडचणी येतात. त्यावर तत्काळ तोडगा काढावा, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली होती.  त्या पार्श्वभूमीवर आता नवीन ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात येणार असून, सोसायटींमधील अतिधोकादायक झाडे काढण्याच्या तक्रारी २४ तासांत सोडवण्यात येणार आहेत. तसेच, कमी धोकादायक झाडे काढणे,  वृक्ष छाटणी आणि अन्य तक्रारी ७२ तासांत सोडवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, आमदार महेश लांडगे यांनी सुरू केलेल्या ‘परिवर्तन हेल्पलाईन’ द्वारे मिळालेल्या तक्रारी प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्यात याव्यात, असे निर्देशही आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.

असे असेल पोर्टल
झाडांबाबतच्या तक्रारीसाठी ऑनलाईन पोर्टल तयार केले जाणार आहे. त्यामध्ये नागरिकांना धोकादायक झाडाची तक्रार रजिस्टर करता येईल. तसेच, त्याचा फोटो, लोकेशन आणि अपेक्षित कारवाईबाबत नोंदणी करता येणार आहे. सदर तक्रार सोडवून संबंधित तक्रारदाराला अपडेट मिळेल, अशा स्वरूपाचे पोर्टल विकसित करण्याबाबत प्रशासन कार्यवाही करणार आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी सुरू केलेल्या 'परिवर्तन हेल्पलाईन'साठी नियमितपणे सुमारे १५० तक्रारी प्राप्त होत आहेत. पावसाळ्यात या तक्रारींमध्ये आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नालेसफाई, ड्रेनेज लाईन, स्ट्रॉम वॉटर लाईन, नागरी आरोग्य, रस्त्यांवरील खड्डे, आपत्ती व्यवस्थापन अशा मुद्यांवर महापालिका प्रशासनाला सूचना केली आहे. त्यावर सकारात्मक कार्यवाहीचा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest