पिंपरी-चिंचवड: वशिल्याच्या रुग्णांना सेवा अन् सामान्यांना हेलपाटे!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) अनागोंदी आणि नियोजनशून्य कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना सध्या बसतो आहे. या ठिकाणी उपचारासाठी राज्यभरातून दररोज हजारो नागरिक येतात.

संग्रहित छायाचित्र

अनागोंदी, नियोजनशून्य कारभारामुळे वायसीएममध्ये रुग्णांची हेळसांड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) अनागोंदी आणि नियोजनशून्य कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना सध्या बसतो आहे. या ठिकाणी उपचारासाठी राज्यभरातून दररोज हजारो नागरिक येतात. मात्र, वायसीएम रुग्णालयातील ज्या रुग्णाचा वशिला असतो, ज्या रुग्णासाठी राजकीय पदाधिकारी, पालिकेतील अधिकारी, नगरसेवक यांचे फोन येतात, त्यांनाच योग्य आणि वेळेत उपचार मिळतात. अन्य रुग्णांना मात्र केसपेपर काढण्यापासून ते औषधे मिळविण्यापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगर येथे महापालिकेचे सुसज्ज असे वायसीएम रुग्णालय आहे. दररोज येथे दोन हजार ते अडीच हजार रुग्ण येतात. यामध्ये बाहेरील शहरातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर अधिक ताण येतो. साध्या आजारांपासून ते मोठमोठ्या शस्त्रक्रिया माफक दरात येथे केल्या जातात. राज्यातील सर्वच भागांतील गोरगरीब रुग्ण या ठिकाणी येऊन उपचार करत असतात. मात्र, उपचारादरम्यान या रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्या रुग्णांची ओळख आहे, ज्यांचा वशिला आहे, ज्या रुग्णांसाठी मान्यवरांचे फोन येतात, अशा रुग्णांना व्हीआयपी उपचार दिले जातात. मात्र, इतर सर्वसामान्य रुग्णांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. एक एका कागदपत्रासाठी हेलपाटे मारावे लागतात.


रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टर कधी येतील, याची वेळ नाही. रुग्णाला नेमके कोणते उपचार दिले जात आहेत, रुग्णाची परिस्थिती कशी आहे, रुग्ण बरा होण्यासाठी किती दिवस लागतील , याबाबतची माहितीही नागरिकांना दिली जात नाही. त्यामुळे उपचार जरी चांगले आणि माफक दरात मिळत असले तरी वायसीएममधील अनागोंदी आणि नियोजनशून्य कारभाराचा रुग्णांना मोठा फटका बसत आहे.


वायसीएम रुग्णालयात रुग्णाला दाखल केल्यानंतर सर्व प्रकारचे उपाचार रुग्णालयामार्फतच दिले जातात. मात्र, अनेक रुग्णांना डॉक्टर बाहेरून औषधे आणण्यासाठी पाठवितात. संबंधित औषधे रुग्णालयात उपलब्ध नाहीत, बाहेरच्या मेडिकलमध्ये मिळतील, असे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे आणण्यासाठी पाठविले जाते. याचा मोठा आर्थिक फटका रुग्णांना बसत आहे.

चाचण्यांमध्ये कट प्रॅक्टीस ?
वायसीएम रुग्णालायामध्ये रक्त चाचण्या, एक्स रे, सोनोग्राफ्री, सिटी स्कॅन, एमआरआय अशा विविध प्रकारच्या चाचण्या होतात. या सर्व चाचण्या करण्यासाठीची उपकरणे रुग्णालयात उपलब्ध आहेत. असे असतानाही रुग्णालयातून रक्त चाचण्यांसाठी रुग्णांना बाहेरील लॅबमध्ये पाठवले जाते. लॅबचालक आणि रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचे लागेबंध असल्याने रुग्णांना चाचण्यांसाठी बाहेर पाठिवले जात असल्याचे आरोप रुग्ण आणि नातेवाईक करत आहेत.

वायसीएम-एक दृष्टिक्षेप
७५० - बेड
१५ ते १६ - विभाग
२००० ते २५०० - ओपीडी (दररोज)
३५० - डॉक्टर
५० - शस्त्रक्रिया (दररोज)

रुग्णालयात सर्व औषधे उपलब्ध आहेत. तसेच सर्व प्रकारच्या चाचण्या रुग्णालयात होतात. शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या उपलब्धतेबाबत काही अडचणी आहेत, त्या लवकरच सोडविण्यात येतील. कोणत्याही रुग्णाला वशिला किंवा इतर कारणाने व्हीआयपी उपचार दिले जात नाही. प्रत्येक रुग्णाला गरजेप्रमाणे उपचार उपलब्ध करून दिले जातात.
- डॉ. अभय दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा विभाग प्रमुख वायसीएम

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest