पिंपरी चिंचवड: पांढरकर उद्यानात कचरा अन् तुटलेल्या खेळणीचा देखावा

ऐन उन्हाळ्यात बच्चे कंपन्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे शहरातील उद्यानांमध्ये गर्दी होत आहे. मात्र, उद्यानांची झालेली दुरवस्था, तुटलेली खेळणी आणि जागोजागी साठलेला कचरा याकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

पांढरकर उद्यानात कचरा अन् तुटलेल्या खेळणीचा देखावा

भर उन्हाळ्याच्या सुट्टीत बालचमूंचा होतोय हिरमोड, महापालिकेच्या उद्यान विभागाचे झाले दुर्लक्ष

पंकज खोले
ऐन उन्हाळ्यात बच्चे कंपन्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे शहरातील उद्यानांमध्ये गर्दी होत आहे. मात्र, उद्यानांची झालेली दुरवस्था, तुटलेली खेळणी आणि जागोजागी साठलेला कचरा याकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. आकुर्डीतील पंचतारा नगर येथील पांढरकर उद्यानामध्ये हीच स्थिती असून, या कारभारामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

आकुर्डी पंचतारा नगरमधील पांढरकर उद्यानात मोठ्या प्रमाणात कचरा व नारळाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या नारळाच्या झाडाच्या फांद्या व कचरा या उद्यान मध्ये पडून असून, उद्यान विभागाचे लक्ष नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्टी लागल्याने परिसरातील लहान मुले सायंकाळी शहरातील विविध उद्यानात खेळण्यासाठी जात आहे. मात्र, उद्यानातील अस्वच्छता आणि अशाप्रकारे तुटलेल्या खेळण्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत तक्रार करायची कुठे, असा देखील प्रश्न नागरिकांना पडला आहे.

 शहरातील विविध उद्यानांतील बरीच खेळणी तुटली आहेत. त्या तुटलेल्या खेळणीचे निघालेले रॉड, तुटलेले प्लास्टिक आणि लोखंडी खांब तेथेच असल्याने ते लागून इजा होऊ शकते. दुसरीकडे, उद्यानाची वेळोवेळी साफसफाई न केल्याने मोठ्या प्रमाणात कचरा आणि पाळापाचोळा साचलेला असतो. उद्यानात  कचरा साचला असल्यामुळे नागरिक उद्यानात येण्याचे टाळतात. तर, तुटलेल्या खेळण्यामुळे इजा होऊ शकते यासाठी लहान मुलांना देखील नेत नाहीत. याकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

स्थानिक नागरिकांनी संबंधित उद्यान कर्मचाऱ्याकडे विचारणी केली असता, ते सुद्धा व्यवस्थित उत्तर देत नाहीत. त्यामुळे साफसफाई करून लवकरात लवकर नवी खेळणी बसवावीत, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

उद्यानात वाहनांचे पार्किंग

शहरातील विविध ठिकाणी थेट उद्यानात वाहने पार्क करण्यात येतात. श्रीधर नगर येथील उद्यानात एक मोटार थेट लहान मुले खेळत असलेल्या खेळण्याच्या जवळ पार्क केलेली असते. त्यामुळे सर्वसामान्यांना वेगळा नियम व कर्मचाऱ्यांना वेगळा नियम असल्याचे दिसून येते.

उद्यानाची त्वरित साफसफाई करून ते लहान मुलांना खेळण्यायोग्य बनवावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत उद्यान विभागाला पत्र दिले आहे. त्यावर कार्यवाही न झाल्यास थेट आयुक्तांकडे याची तक्रार करण्यातील येईल.

-निखिल दळवी ,संस्थापक अध्यक्ष, विठ्ठल प्रतिष्ठान, आकुर्डी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest