संग्रहित छायाचित्र
पंकज खोले
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएकडून (PMRDA) अनधिकृत फलक आणि होर्डिंगवर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. परवानगीबाबत आवाहन आणि नोटिसा देऊनही ती घेण्याबाबत होर्डिंगधारकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. पीएमआरडीएच्या हद्दीत हजारोच्या संख्येने असणाऱ्या होर्डिंगधारकांपैकी केवळ १७६ प्रस्ताव परवानगीसाठी दाखल झालेले आहेत. यामुळे अधिकृत होर्डिंगबाबत पुढे येण्यासाठी उदासीनता दिसून येते.
पीएमआरडीए क्षेत्रातील सर्व अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरित जाहिरात फलक मालक, जागा मालक, विकासक, जाहिरातदार संस्था यांनी हटवावेत किंवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ते लावण्याची परवानगी घ्यावी, असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र विभाग आणि पथक देखील नेमण्यात आले आहे. मात्र, या पथकाकडून सर्वेक्षण वगळता ठोस अशी कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे या अनधिकृत होर्डिंगधारकांचे चांगलेच फावत आहे.
दरम्यान, या पूर्वी केलेल्या आवाहन केल्यानंतर आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्सधारकांनी परवानगी घेण्याकरिता परवानगी विभागाकडे केवळ १७६ प्रस्ताव दाखल केले आहेत. इतरांनी अद्याप अपेक्षित असा प्रतिसाद दिलेला नाही. सद्यस्थितीत जवळपास १ हजाराहून अधिक होर्डिंगची माहिती गोळा केली आहे.
वादळ व पावसामुळे गेल्या वर्षी जाहिरातींचे फलक व सांगाडे कोसळून दुर्घटना घडल्या होत्या. त्यामुळे प्राधिकरण कार्यक्षेत्रामध्ये होर्डिंग पडून, कोसळून दुर्घटना होणार नाही याची खबरदारी म्हणून महानगर नियोजनकार सुनील मरळे यांच्या अध्यक्षतेखाली आकाशचिन्ह कक्ष (कारवाई विभाग) तहसीलदार तथा कक्ष प्रमुख सचिन मस्के यांच्या कारवाई पथकाने आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्सधारकात जनजागृती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नोटिसा जाहीर करण्यात आल्या असून, परवानगी घेण्याबाबत आवाहन देखील करण्यात आले आहे. मात्र, यावर ठोस कार्यवाही होत नसल्याने परवानगीबाबत उदासीनता दिसून येत आहे.
पाच जणांनी काढले स्वतः बॅनर
जाहिरात फलकावरील पत्रा, कापड स्वतःहून काढण्यास प्रवृत्त करण्यात आल्याने काही फ्लेक्सधारकांनी फ्लेक्सवरील पत्रा, कापड स्वतःहून काढून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच ५ आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्सधारक यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःहून निष्कासित केले आहेत.
कारवाईची निविदा अडकली लालफितीत
अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग यावर कारवाईबाबत पीएमआरडीकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली होती. मात्र, त्या दरम्यान आचारसंहिता लागू झाल्याने त्याबाबत पुढील प्रक्रिया करण्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती मागवण्यात आली होती. आता ही प्रक्रिया पूर्णत: अडकून पडली आहे. त्यामुळे कारवाई नसल्याने या अनधिकृत होर्डिंगधारकांचे चांगलेच फावत आहे.
"अनधिकृत, धोकादायक आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरित स्वतःहून काढून घ्यावेत. अन्यथा या विरोधात लवकरच मोठी मोहीम राबवून निष्कासित करण्यात येतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी."
- सुनील मरळे, महानगर नियोजनकार, पीएमआरडीए
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.