मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कारला भीषण अपघात
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर टाकवे खुर्द गावाजवळ वळणावर भरधाव वेगातील कार पलटी होऊन रस्त्याच्या साईडला खड्ड्यात पडल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहे. 28 एप्रिल रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला आहे. याप्रकरणी कार चालक प्रवीण नागू लोहार (वय 34, रा. पवळे, सध्या राहणार मळवली) यांच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवी कलम 304 (A), 279, 337, 338 मोटर वाहतूक कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मयुर ज्ञानेश्वर पंडीत (वय 26 वर्षे, रा.मळवली) यांनी अपघाताची फिर्याद दिली आहे. (Mumbai Pune Highway Accident)
या अपघातात बबन राघु सुतार (वय 50 वर्षे रा. वडगाव मावळ म्हाळसकर कॉलनी), आर्यन ज्ञानेश्वर भालेकर (वय 10 वर्षे रा. जाधववाडी नवलाख उंबरे) यांचा मृत्यू झाला असून मयुर ज्ञानेश्वर पंडीत (वय 26 वर्षे रा.मळवली), प्रविण नागू लोहार (वय 34 वर्षे रा. पवळे, सध्या राहणार मळवली), रक्तेश बाबसाहेब सोनवणे (वय 21 वर्षे रा.भाजे) हे जखमी झाले आहेत.
फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत व जखमी हे सर्व जन कार क्रमांक (MH.14 FS.6578) मधून कार्ला फाटा येथून पुण्याच्या दिशेने जात असताना टाकवे गावाजवळ वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन खड्ड्यात पडली. यामध्ये गंभीर मार लागल्याने दोघांचा मृत्यू झाला तर चालकासह तीन जण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक भारत भोसले हे पुढील तपास करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.