नौशाद शेखच्या घरावर बुलडोझर फिरवा
पिंपरी चिंचवड: क्रिएटिव्ह अकॅडमी (Creative Academy) या निवासी शाळेचा संचालक नौशाद शेखच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरवला पाहिजे. महाराष्ट्रातदेखील 'योगी पॅटर्न'ची आता गरज आहे. त्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करीत आहोत. शेखची तीन लग्न झाली आहेत. त्याने या सर्व गोष्टी ठरवून केल्या आहेत. शेख याने जर अजून कोणाला या पद्धतीने त्रास दिला असेल तर पीडितांनी किंवा तिच्या पालकांनी बजरंग दलाशी (Bajarang Dal) संपर्क साधावा. आम्ही पीडितांच्या पाठीशी उभे राहू. तसेच पोलीस सध्यातरी योग्य पद्धतीने तपास करीत आहेत, पण त्यात कमतरता जाणवल्यास बजरंग दल आपल्या पद्धतीने याचा बीमोड करेल, असा इशारा भाजपच्या (BJP) तीनही आमदारांच्या उपस्थितीत बजरंग दलाचे संयोजक कुणाल साठे यांनी दिला. (Pimpri Chinchwad News)
अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेचा संचालक नौशाद शेख याच्या विरोधात आता पिंपरी-चिंचवडमधील हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. एका मुलीने पुढे येत तक्रार केल्यानंतर आता अन्य काही विद्यार्थिनी देखील पुढे येऊ लागल्या आहेत. दहा वर्षांपूर्वी नौशाद शेखवर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता, मात्र त्यावेळी त्याला राजकीय मदत मिळाल्याने तो कारागृहातून बाहेर आला असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेचे नितीन वाटकर यांनी यावेळी केला आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन शेखबाबत काही धक्कादायक खुलासे केले. यावेळी भाजपचे आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, बजरंग दलाचे संयोजक कुणाल साठे, विश्व हिंदू परिषदेचे (VHP) नितीन वाटकर, धनंजय गावडे, संतोष गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले, नौशाद शेख प्रकरणात कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी कारवाई करावी. आरोपीला कठोर शासन झाले पाहिजे. पीडित विद्यार्थिनींचे समुपदेशन केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येतील. मुलींच्या वसतिगृहात पुरुषांना राहता येत नाही. तरी देखील नौशाद शेख हा मुलींच्या वसतिगृहात राहात होता. मागील वेळी नौशाद शेख प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला, पण तो आता झाल्यास खपवून घेतला जाणार नाही. अशा घटनांमुळे शहराचे नाव खराब होत आहे. आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. सर्व शक्यता लक्षात घेत शेख याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी.
आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या, शेख याने यापूर्वीही अशा प्रकारचा गुन्हा केला होता. त्यावेळी त्याला राजकीय मदत मिळाली. यावेळी त्याला कठोर शासन व्हावे, यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत. आणखी काही मुली शेखच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. ती संस्थाच बंद करण्याबाबत पालिकेने कार्यवाही करावी.
आमदार उमा खापरे म्हणाल्या, नौशाद शेखने सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन क्रिएटिव्ह अकॅडमीच्या शाखा सुरू केल्या आहेत. त्यानुसार त्या शाखांवर देखील पोलिसांनी कारवाई करावी. असा प्रकार शहरात होत आहे, तो अतिशय वाईट आहे.
भाजपची महिला ब्रिगेड होणार सक्रिय
आमच्याकडे हा विषय आल्यानंतर आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्याला आतापर्यंत यश आले आहे. संबंधित शिक्षण संस्थेवर कारवाई करण्याबाबत महापालिका आयुक्त, शिक्षणाधिकारी यांना पत्र दिले आहे. याबाबत शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी भाजपने महिला ब्रिगेड तयार केली आहे. महिलांच्या बाबतीत कोणत्याही अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिला ब्रिगेड काम करणार आहे. शहरातील पीडित महिलांनी महिला ब्रिगेडशी संपर्क करावा, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
नौशाद शेख प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी योग्य तपास केला आहे. पोलिसांनी विद्यार्थिनींचे समुपदेशन केले. अनेक विद्यार्थिनी तक्रार देण्यासाठी तयार झाल्या आहेत. २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या कालावधीत अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संस्थेत शिकणाऱ्या मुलींचे ब्रेन वॉश करून धर्मांतरण, वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे काही प्रकार झाले आहेत का, या शक्यतांचा तपास पोलीस करीत आहेत.
- -नितीन वाटकर, विश्व हिंदू परिषद
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.