Pimpri Chinchwad: रस्ते झाले छोटे, फूटपाथ झाले मोठे

पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) रस्ते विकसित केले जात आहेत. शहरातील काही प्रमुख रस्ते आणि पदपथावर सुमारे ५६८ कोटींचा चुराडा होणार आहे.

संग्रहित छायाचित्र

रस्त्यांलगतच्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी फूटपाथ झाले प्रशस्त, पादचारी रस्त्यावर, व्यावसायिक व पार्किंग स्पाॅट फूटपाथवर

विकास शिंदे- 
पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) रस्ते विकसित केले जात आहेत. शहरातील काही प्रमुख रस्ते आणि पदपथावर सुमारे ५६८ कोटींचा चुराडा होणार आहे. मात्र, सध्यस्थितीत महापालिकेने विकसित केलेल्या रस्त्यांवर तब्बल २०० कोटीचा खर्च झाला आहे. तरीही रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. तर काही रस्ते खूपच छोटे होऊन फूटपाथ मोठे झाले आहेत. त्यामुळे रस्त्यालगतच्या मोठे व्यावसायिक यांसह हातगाडी, पथारी व्यावसायिकांना प्रशस्त फूटपाथ वापरण्यास मिळू लागले आहेत. तर काही व्यावसायिकांच्या पार्किंगची उत्तम व्यवस्था उपलब्ध झालेली आहे. यामुळे पालिकेने पादचारी नागरिकांना प्रशस्त फूटपाथवरून चालता यावे, हा उद्देश असफल होऊ लागला आहे.    

पिंपरी-चिंचवड शहरातील रहदारी विचारात घेऊन रस्ते विकसित करण्यासाठी महापालिकेने सुरुवात केली आहे. महापालिकेने शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) विविध रस्ते विकसित केले जात आहेत. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते, पादचारी मार्ग, सायकल स्वारांसाठी सायकल मार्ग, टू व्हीलर आणि फोर व्हीलरला पार्किंग स्पाॅट, आकर्षक पथदिवे, या सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील असा महापालिकेचा प्रयत्न आहे. या धोरणानुसार नागरिक व लहान मुलांसाठी शहरात ठिकठिकाणी सायकल ट्रॅक उभारण्यात येत असून पादचारी मार्गदेखील प्रशस्त बनवून आकर्षक केले जात आहेत. मात्र शहरातील अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार बनवलेल्या रस्त्यांना आता अतिक्रमणांचे ग्रहण लागले आहे.

पालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाकडून पुणे-मुंबई महामार्ग, टेल्को रोड ते बालाजीनगर, पवना ब्रिज ते डांगे चौक, डांगे चौक ते भूमकर चौक आणि शिवार चौक ते गोविंद गार्डन हॉटेल हे रस्ते विकसित करण्यात येत आहेत. तर स्थापत्य विभागाने संत तुकारामनगर ते यशवंतनगर यासह अन्य काही रस्ते विकसित करायला घेतले आहेत. त्यावर सुमारे २०० कोटी रुपये खर्च झाले असून, रस्ते सुशोभीकरणाचा हा प्रकल्प अजूनही सुरू आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि पदपथांवर ५६८ कोटी खर्च होणार आहे. महापालिकेने अर्बन स्ट्रीट रस्त्यावर आतापर्यंत तब्बल २०० कोटी रुपयांचा चुराडा करूनही पदपथ प्रशस्त रुंद आणि देखणे झाले तरी त्यांचा वापर पादचाऱ्यांपेक्षा अनधिकृत पथारी आणि वाहन पार्किंगसाठीच केला जात आहे. महापालिकेचे स्थापत्य व क्षेत्रीय अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.  दरम्यान, क्षेत्रीय कार्यालयांच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येते, मात्र, ही कारवाई जुजबी असल्याने काही दिवसांतच फूटपाथवर जैसे थे स्थिती निर्माण होत आहे.

सायकल मार्गावर अडथळ्यांची शर्यत...

महापालिकेने शहरात रस्ते, पदपथ विकसित करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी सुस्थितीतील रस्ते तोडून नव्याने तयार केले जात आहेत. अधिक रुंदीचे पदपथ बनवून सायकल मार्गाची भर घातली जात आहे. मात्र, हे पदपथ, सायकल मार्ग एकसलग नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सांडपाणी वाहिनीचे झाकण, पदपथावरील झाडे, विजेचे खांब, बाके, कठडा, नामफलक असे अडथळे पार करीत ये-जा करताना पादचाऱ्यांसह सायकलस्वारांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

रस्त्यांची रुंदी झाली कमी

पुणे-मुंबई महामार्ग, टेल्को रोड ते बालाजीनगर, पवना ब्रिज ते डांगे चौक, डांगे चौक ते भूमकर चौक आणि शिवार चौक ते गोविंद गार्डन हॉटेल या पाच रस्त्यांवर अर्बन स्ट्रीट अंतर्गत पदपथ विकसित आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. पुणे-मुंबई महामार्ग बीआरटीमुळे अरुंद झाला आहे. पायी चालणाऱ्यांची संख्या वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. रस्ते अर्बन स्ट्रीटनुसार विकसित झाल्यानंतर रस्त्याची रुंदी आणखी कमी होऊन वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

प्रशस्त फूटपाथ पडले अतिक्रमणाला बळी

शहरात पथ धोरणांतर्गत रस्ते विकसित करताना रस्ते रुंद आणि फूटपाथ प्रशस्त केले जात आहेत. त्यामुळे पादचा-यांपेक्षा छोट्या - मोठ्या व्यावसायिकांना अधिक फायदा होऊ लागला आहे. अनेक पदपथांवर दुकानदार, विक्रेते, वाहनचालक अतिक्रमण करत आहेत. दुकानदार साहित्य पदपथावर मांडतात. वाहने थेट पदपथावरच पार्क केलेली दिसून येत आहेत. हातगाडी, पथारीवाले टेबल, खुर्च्या मांडूनच व्यवसाय थाटले आहेत. या अतिक्रमणांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून पादचारी नागरिकांना आणखी देखील रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे हा खर्च नेमका कोणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोणत्या रस्त्यावर किती खर्च?

दापोडी ते पिंपरी (दोन्ही बाजू) पदपथ व सायकल मार्गावर प्रस्तावित खर्च - १०९ कोटी

पिंपरी ते निगडी (एक बाजू)- ६० कोटी, निगडी ते पिंपरी (एक बाजू)- ६० कोटी

टेल्को रोड-लांडेवाडी ते थरमॅक्स चौक – १६० कोटी

बिर्ला रुग्णालय ते डांगे चौक- १९ कोटी

डांगे चौक ते कस्तुरी चौक- १५ कोटी

शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक- ५५ कोटी

सांगवी ते किवळे- ९० कोटी

महेशनगर ते यशवंतनगर - २० कोटी

रस्ते हे शहराची प्रगती आणि विकासाची ओळख असतात. रस्त्यांची रचना, रुंदी, पादचारी मार्ग तसेच सायकल मार्ग या गोष्टींचा विचार करून रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. पादचारी नागरिकांची सोय व्हावी म्हणून रस्ते, पदपथ विकसित केले जात आहेत. रस्ता हा मोठा प्रभाव टाकणारा घटक असतो. रस्त्यावरील सायकल मार्ग, फुटपाथचा वापर व्हावा, त्यावर अतिक्रमण होऊ नये म्हणून नागरिकांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे, पदपथावरील अतिक्रमण हटवण्यासाठी लवकरच स्वतंत्र पथक तयार करत मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. त्यानंतर पदपथावरील कारवाईला वेग येईल.

— मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest