भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील रस्त्यावर पडले भगदाड
विकास शिंदे
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे महापालिकेने तब्बल ९० कोटी ५३ लाख रुपये खर्च करून वर्तुळकार उड्डाणपूल बांधला. मात्र, चार वर्षात उड्डाणपुलाच्या रस्त्यावर भगदाड पडले आहे. निगडीच्या अंकुश चौकातून भक्ती-शक्तीकडे जाताना उड्डाणपुलावरील रस्ता पोकळ होऊन हा खड्डा पडला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करू लागले आहेत. (Pimpri-Chinchwad)
निगडी येथील भक्ती-शक्ती चौक हा पिंपरी-चिंचवड शहरातील गजबजलेला परिसर आहे. प्राधिकरण, स्पाइन रोड, किवळे मुकाई चौक आणि जुना मुंबई-पुणे रस्ता या चौकात एकत्र येतो. भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक हा ४५ मी. रुंदीचा बीआरटीएस रस्ता विकसित झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून थेट भक्ती-शक्ती या चौकात नागरिक येत आहेत. या चौकातील बीआरटीएस टर्मिनलमुळे नागरिकांची प्रचंड गर्दी असते. या चौकातून चिखली, तळवडे आयटी पार्क येथून हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी कायम वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी उड्डाणपूल बांधला आहे.
महापालिकेने भक्ती-शक्ती चौकातील (Bhakti Shakti Chowk) वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. शहराच्या प्रवेशद्वारावरच वाहतूक कोंडी होऊ लागल्याने महापालिकेवर वारंवार टीका होत होती. भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपूल या प्रकल्पावर पालिकेने एकूण ९० कोटी ५३ लाख रुपये खर्च करून डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत हे काम पूर्ण केले. यामध्ये हॉटेल पूना गेट ते श्रीकृष्ण मंदिरापर्यंत ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पूल तयार केला. प्राधिकरणातून भोसरी, पुणे व मुंबईकडे जाण्यासाठी स्वतंत्र पूल उभारण्यात आला. स्पाईन रस्त्याला समांतर ग्रेड सेपरेटर केला आहे. ये-जा करणा-या वाहनांसाठी स्वतंत्र लेन आहे. त्यामुळे प्राधिकरण व मोशी हा दक्षिण व उत्तर वाहतुकीमुळे शहर जोडले गेले आहे.
नाशिक महामार्गावरून देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाकडे जाणारी जड वाहने ग्रेड सेपरेटरमधून ये-जा करत आहेत. वर्तुळाकार पूल हा साठ मीटर व्यासाचा आहे. तीन लेनच्या मार्गांची रुंदी साडेपंधरा मीटर आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गास समांतर असा एकसष्ट मीटर रुंदीच्या ग्रेड सेपरेटर तयार केला आहे. दरम्यान, निगडीच्या अंकुश चौकातून भक्ती-शक्ती उड्डाणपुलावर ह्या ठिकाणी रस्ता खचला आहे. हा रस्ता खचून त्यावर भगदाड तयार झाले आहे. त्याच ठिकाणी रस्ता पोकळ झाला असून त्यावरून वाहन गेले तर आणखी मोठे भगदाड तयार होणार आहे. त्या उड्डाणपुलावर हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे रस्ता खचून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
याबाबत महापालिका स्थापत्य प्रशासनाकडून आणखी कोणीही दखल घेतलेली नाही. उड्डाणपुलावर हे भगदाड पडले असताना त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. हा रस्ता खचला असून त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. संबंधित उड्डाणपुलाचे तत्काळ दुरुस्ती करावी, त्या ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकून नुकसान भरपाई घ्यावी, संबंधित अधिकाऱ्यांना दोषी धरून कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
आयुक्तांकडे तक्रार
निगडी येथील अंकुश चौक मार्गे भक्ती शक्ती उड्डाणपूल ह्या ठिकाणी रस्ता खचला आहे. महापालिका स्थापत्य विभागाने अंकुश चौक मार्गे भक्ती-शक्ती उड्डाणपूल ह्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवला आहे. त्यामुळे उड्डाणपूल वर जाताना रस्ता खचून भगदाड पडले आहे. या शेजारी रस्ता पोकळ झाला असून वाहनाची ये - जा झाल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ताबडतोब दखल घेऊन उड्डाणपूल रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशी तक्रार करण्यात आली आहे.
निगडीच्या अंकुश चौकातून भक्ती-शक्ती उड्डाणपुलाकडे जाताना रस्ता खचला आहे. त्या ठिकाणी पुलावर भगदाड पडले आहे. भगदाडाशेजारी भाग पूर्णपणे पोकळ झाला असून त्यावर वाहन गेल्यास रस्ता आणखी खचून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. हा उड्डाणपूल रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. आयुक्तांनी तत्काळ दखल घेऊन उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरुस्ती करावी. संबंधित ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकावे,
-सचिन काळभोर, चिटणीस, शहर भाजप, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.