पिंपरी-चिंचवड: अत्यावश्यक कामात पाणीपुरवठ्यासाठी खोदला रस्ता, सूचना फलकाअभावी खोदलेल्या खड्ड्यात कोसळले वाहन

शहरात मान्सून दाखल होण्यापूर्वीच रस्त्यांचे खोदकाम करून रस्ते पूर्ववत करण्यात येतात. खोदकामामुळे पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊन अपघातांचा धोका असतो. महापालिका आयुक्तांनी १५ मे पासून शहरात कोणत्याही प्रकारे खोदकाम करू नये, असे आदेश दिले आहेत.

PCMC

सूचना फलकाअभावी खोदलेल्या खड्ड्यात कोसळले वाहन

पाणीपुरवठ्याचे खोदकाम नागरिकांच्या जिवावर बेतणारे?

विकास शिंदे - 

शहरात मान्सून दाखल होण्यापूर्वीच रस्त्यांचे खोदकाम करून रस्ते पूर्ववत करण्यात येतात. खोदकामामुळे पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊन अपघातांचा धोका असतो. महापालिका आयुक्तांनी १५ मे पासून शहरात कोणत्याही प्रकारे खोदकाम करू नये, असे आदेश दिले आहेत. परंतु, अत्यावश्यक कामे म्हणून १५ जूनपर्यंत पाणीपुरवठा विभागाची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. रावेतमधील बीआरटी लेन रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. त्याच खोदलेल्या खड्ड्यात सोमवारी (२० मे) रात्री उशिरा चारचाकी वाहन पलटी झाले. मात्र, सुदैवाने या वाहनाचा चालक बचावला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने हे खोदकाम नागरिकांच्या जिवावर बेतण्याची दाट शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad)  शहरात सार्वजनिक आणि खासगी अशा सेवा-सुविधांच्या निर्मितीसाठी शहरात सातत्याने रस्त्यांचे खोदकाम केले जाते. त्यासाठी शुल्क भरून महापालिकेची परवानगी घेणे गरजेचे आहे, तर पावसाळ्यात खोदकाम पूर्णपणे बंद ठेवणे अपेक्षित असते. मात्र, मागील काही वर्षात आवश्‍यक कामांच्या नावाखाली पालिका कंत्राटदार व इतर खासगी संस्थांकडून पावसाळ्यातही खोदकाम सुरू असते. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होऊन अपघातांना निमंत्रण मिळते. दरम्यान, या वर्षी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी १५ मे ते १५ ऑक्‍टोबर या पावसाळ्यातील कालावधीत खोदकाम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

पाणीपुरवठा विभाग, फायबर नेटवर्किंग, महावितरण, एमएनजीएची पाइपलाइन टाकण्यासह विविध कामांसाठी खोदकाम करण्याकरिता १५ मे २०२४ पर्यंत परवानगी दिली गेली होती. तसेच विविध सेवा वाहिन्यांच्या कामासाठी वारंवार केले जाणारे खोदकाम आणि त्यानंतर केल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या रस्ते दुरुस्तीमुळे शहरात वाहन चालवणे अवघड होते. त्यामुळे लहान-मोठे अपघात होतात. ते टाळण्यासाठी शहरातील मुख्य रस्ते आणि अतिवर्दळीच्या रस्त्यांवरील जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिका, पावसाळी गटारे, इंटरनेट आणि अन्य केबल, एमएनजीएल तसेच, वीज वाहिन्यांची कामे येत्या १५ मे पर्यंत पूर्ण करावीत, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानंतर खोदकामास परवाना दिली जाणार नाही. केवळ अत्यावश्यक बाब म्हणून काही कामांसाठी खोदकामाला परवानगी दिली जाणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील पाईपलाईन टाकण्यासाठी एक ते चार कामांच्या खोदकामाला विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. त्यातील रावेतमध्ये निवृत्ती लाॅन्स येथील बीआरटी मार्गात खोदकाम सुरू आहे. ही पाईपलाईन बीआरटी मार्गातून खोदकाम करत टाकण्यात येत आहे. पण, रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे एका वाहनचालकाने बीआरटी मार्गात फोर व्हीलर घातली. परंतु, रस्ता खोदला असल्याचा अंदाज न आल्याने त्याची गाडी थेट खड्ड्यात गेली. त्यामुळे त्या वाहनातील चालक बचावला असून सुदैवाने त्याला काही दुखापत देखील झाली नाही. त्यामुळे खोदकाम नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रस्ते खोदलेले, कामाचे बोर्ड नाहीत

शहरातील रस्त्यांची खोदाई करताना निविदा अटी व शर्तींनुसार ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी बोर्ड लावणे आवश्यक आहे; परंतु ठेकेदारामार्फत कोणत्याही प्रकारचे बोर्ड कामाच्या ठिकाणी लावले जात नाहीत. बोर्ड लावण्याची कार्यवाही करण्यात यावी. बोर्डावर कामाचे नाव, काम सुरू दिनांक, पूर्ण दिनांक, ठेकेदाराचे नाव, दूरध्वनी क्रमांक द्यावे.  पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, विद्युत यांनी खोदाईबाबत समन्वय काम करावे, असेही महापालिका अधिका-यांकडून सांगण्यात येत आहे.

पावसाळ्यात कोणत्याही कामासाठी रस्ते आणि पदपथ खोदकामास परवानगी दिली जाणार नाही. केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कामांना अटी आणि नियम टाकून परवानगी दिली जाणार आहे. विनापरवाना खोदकाम केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई तसेच, फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार सर्व यंत्रणांना १५ मे ते १५ ऑक्‍टोबर २०२४ या कालावधीत खोदकाम बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. सद्यस्थितीत खासगी संस्थेला रस्ते खोदकामास परवानगी दिलेली नाही.
- मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

 

शहरात १५ मे पासून रस्ते खोदकाम बंद केले आहे. पण, महापालिका आयुक्तांची विशेष परवानगी घेऊन एक ते चार कामांसाठी पाणीपुरवठा विभागाची पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगी घेतली आहे. त्यानुसार पाईपलाईन टाकण्यासाठी आणि चोवीस बाय सात मधील काही कामे करण्यास १५ जून अगोदर सर्व कामे पूर्ण केली जातील. बीआरटी मार्गात खासगी वाहनांना परवानगी नाही. तरीही लोक बॅरिगेडला वळसा घालून गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे खोदकाम केलेल्या ठिकाणी नागरिकांनी वाहन घेऊन जाऊ नये.
- श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest