पिंपरी चिंचवड: रावेतमध्ये सोसायट्यांच्या मधोमध आरएमसी प्लँट

रावेत येथे रहिवासी सोसायट्यांच्या मधोमध सुरू असलेल्या आरएमसी प्लँटमुळे (रेडी मिक्स सिमेंट प्लँट) परिसरात हवा, ध्वनिप्रदूषण होत आहे. चोवीस तास सुरू असलेल्या आरएमसी प्लँटमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रावेतमध्ये सोसायट्यांच्या मधोमध आरएमसी प्लँट

स्थानिक रहिवासी नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्लँट बंद करण्याच्या मागणीसाठी करा, नागरिकांची महापालिकेसह एमपीसीबीकडे मागणी

रावेत येथे रहिवासी सोसायट्यांच्या मधोमध सुरू असलेल्या आरएमसी प्लँटमुळे (रेडी मिक्स सिमेंट प्लँट) परिसरात हवा, ध्वनिप्रदूषण होत आहे. चोवीस तास सुरू असलेल्या आरएमसी प्लँटमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी)    तक्रार केली. मात्र, त्यावर काहीही कारवाई होत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. (RMC Plants in Ravet)

रावेतमधील चंद्रभागा क्वॉर्नर, विकासनगर भागात रहिवासी, शाळा, कॉलेज आणि रहिवासी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या आरएमसी प्लँटमुळे लहान मुले, शाळेचे विद्यार्थी, अबालवृध्द ज्येष्ठ नागरिक, महिलांसह पुरुषांना श्वसनाचा त्रास वाढला आहे. तसेच हा आरएमसी प्लॅंट रात्रभर सुरू असतो. त्याच्या वाहनाची वर्दळ आणि प्लँटमधील मशिनचा कर्णकर्कश आवाज सुरू असतो. त्यामुळे या भागातील सोसायटीतील नागरिकांना अशुध्द हवा, ध्वनिप्रदूषणामुळे रात्रभर झोपच लागत नाही. त्यामुळे या आरएमसी प्लँटवर तत्काळ कारवाई करून हा प्लँट बंद करा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (RMC Plants in Pimpri Chinchwad)

दरम्यान, चोवीस तास सुरू असणाऱ्या आरएमसी प्लँटला महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून नोटीस दिली आहे. त्यानंतरही तो प्लॅंट बंद करण्यात यावा, असे पत्र फेब्रुवारी महिन्यातच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे देण्यात आले आहे. मात्र, त्यावर एमपीसीबीने कसलीही कारवाई केली नाही. त्यामुळे तेथील रहिवासी नागरिक आक्रमक झाले असून आरएमसी प्लँट बंद व्हावा म्हणून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

रेडी मिक्स काँक्रीट प्लँटमुळे (Ready Mix Concrete Plant) हवा-ध्वनिप्रदूषण वाढले आहे. हा प्लँट सोसायटी परिसरातच आहे. या आरएमसी  प्लँटमुळे नागरिकांना श्वास घेण्यास देखील अडचण येत आहे. ज्येष्ठ अबालवृध्द, लहान मुले, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एक वर्षापासून आम्ही प्रशासनाकडे तक्रार करत आहोत. आमची सगळी सोसायटी धुळीने माखली आहे. तरीही त्या आरएमसी प्लँटवर कारवाई होत नाही. या आरएमसी प्लॅंटवर कारवाई न केल्यास आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
    — संदीप डफळ, अध्यक्ष, संतोष ड्रीम्स सोसायटी, रावेत

रावेतमधील आरएमसी प्लॅंटबाबत तेथील नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. सदर प्लँट बंद करावा, म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाला पत्रही देण्यात आले आहे.
    – संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, महापालिका

रावेत येथील आरएमसी प्लँटबाबत नागरिकांची आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी संबंधित प्लँटची पाहणी केली आहे. सदर तो आरएमसी प्लँट लवकरच बंद करण्यात येईल.
    - मंचक जाधव, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest