सफाई कामगार महिलांचं पालिकेसमोर ठिय्या आंदोलन
सफाई कामाचे कंत्राट संपल्याची पूर्वसूचना न देता काम थांबवल्याने ५० सफाई कामगारांचे वेतन थकले आहे. त्यांच्या हक्काच्या वेतनासाठी सफाई महिला कामगारांनी पालिकेसमोर ठिय्या मांडला होता. आमच्या अतिरिक्त कामाचे पैसे कोण देणार, असा सवाल सफाई महिला कामगारांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेच्या (PCMC) आरोग्य विभागाकडून एका ठेकेदार संस्थेचे सफाईकाम काढण्यात आले. हेडगेवार भवन, सेक्टर १५, मदनलाल धिंग्रा येथील साफसफाई काम महिला कामगारांच्या माध्यमातून केले जाते. परंतु, १७ मार्च २०२४ रोजी या कामाची मुदत संपल्याची कोणतीही पूर्वसूचना सफाई कामगारांना दिली गेली नाही. त्यांना दर महिन्याच्या १ तारखेपर्यंतचे वेतन दिले जाते. कामाची मुदत संपल्याची माहिती नसल्याने सफाई कामगार १ ते १७ मार्चपर्यंत काम करीत राहिले.
१८ मार्च २०२४ रोजी नवीन संस्थेला हे काम देण्यात आले. नवीन संस्थेने १८ मार्चपासून कामाची सुरुवात केली. त्यामुळे १ ते १७ मार्च दरम्यानचे वेतन सफाई कामगाराला मिळालेच नाही. त्यामुळे पोटासाठी साफसफाई करणाऱ्या महिला कामगारांना आर्थिक झळ सोसावी लागली आहे. सफाई कामगार इमानेइतबारे दररोज ठरल्याप्रमाणे काम करीत राहिले, नवीन संस्थेने त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कामगारांना याची माहिती झाली. त्यामुळे १७ दिवसांचा पगार देण्यास जुन्या संस्थेने नकार दिला आहे. त्यामुळे आम्हाला १७ दिवसांचे वेतन कोण देणार, अशी चिंता कामगार महिलांनी व्यक्त केली आहे. वेतनाची मागणी करण्यासाठी ५० सफाई कामगार महिला महापालिकेतील आरोग्य विभागात अधिकाऱ्यांना भेटण्यास आल्या. पण सुरक्षारक्षकांनी त्यांना आत प्रवेश न दिल्याने त्यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. आरोग्य विभागाने हात वर केले तर आमचे हक्काचे वेतन कोण देणार, असा प्रश्न कामगार महिलांनी उपस्थित केला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.