संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे :
विषयपत्रिका प्राप्त न झाल्याने निविदा समितीमधील सदस्यांना विकासकामांबाबत चर्चा करता येत नाही. त्यामुळे या सदस्यांपुढे विषयांची माहिती दोन दिवस आधी कार्यालयीन वेळेत द्या, असे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. सर्व विभागप्रमुखांना हे आदेश दिले असून संबंधित कर्मचाऱ्यांच्या देखील निदर्शनास आणून द्या, अशा सूचना आयुक्तांनी दिलेल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध भांडवली विभागांमार्फत विकास कामांच्या निविदा प्रसिध्द केल्या जातात. या निविदांचे दर उघडल्यानंतर निविदा मंजुरीचे विषय निविदा समितीपुढे सादर केले जातात. त्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार निविदा समितीदेखील गठीत करण्यात आलेली आहे. निविदा समितीची नियमित बैठक आयोजित केली जाते. या बैठकीदरम्यान निविदा समिती सदस्य विविध विकासकामांवर विषयावर चर्चा करतात. मात्र या सदस्यांपुढे सादर केले जाणारे विषय व अनुषंगिक आवश्यक असलेली माहिती बैठकीपूर्वी प्राप्त होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे बैठकीदरम्यान सादर केल्या जाणाऱ्या विषयांवर सविस्तर चर्चा करणे समितीतील सदस्यांना शक्य होत नाही. त्यामुळे निविदा समितीपुढे सादर केले जाणाऱ्या सर्व विषयांची सूची व त्या विषयांसंदर्भात आवश्यक असलेली माहिती निविदा समिती सदस्यांना द्यावी, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी केल्या आहेत. संबंधित विभागांनी बैठकीच्या आयोजनापूर्वी ही माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही आयुक्तांनी सूचित केले आहे. निविदा समितीपुढे सादर केल्या जाणाऱ्या विषयांची सूची व अनुषंगिक माहिती सर्व निविदा समिती सदस्यांना बैठकीच्या कार्यालयीन दिवसांमध्ये दोन दिवसांच्या अगोदर द्यावी. सर्व विभागप्रमुखांनी याची नोंद घेऊन सर्व संबंधित कर्मचाऱ्यांच्या हे निदर्शनास आणून द्यावे, असेही आयुक्तांनी आदेश दिले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.