पोलीस आयुक्तांनी साधला नागरिकांशी संवाद
लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदान प्रक्रियेकरीता पोलिसांकडून चोख बंदोबस्त होता. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांना भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त चौबे यांनी पिंपरी गाव येथील पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील शाळेतील मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी काही ज्येष्ठ तसेच इतर मतदारांशी संवाद साधला. मतदारांनी देखील आयुक्त चौबे यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. पोलिसांकडून चांगले सहकार्य मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
ज्येष्ठ मतदारांना बूथपर्यंत जाण्यासाठी पोलीस मदतीचा हात देत होते. चोख सुरक्षा व्यवस्था राखत असल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपरीगाव बरोबरीनेच आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. दरम्यान, चौबे यांनी दापोडी येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल आणि सांगवी येथील जी. के. गुरुकुल या शाळांमधील मतदान केंद्रांवर भेट दिली. या मतदान केंद्रांवर बंदोबस्तासाठी बाहेरील राज्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांची नेमणूक केली आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी आयुक्त चौबे यांनी संवाद साधला. बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना पुरेशा सुविधा मिळाल्या किंवा कसे, त्यांना न्याहारी, जेवण मिळाले, पाणी आहे का, याबाबत आयुक्त चौबे यांनी विचारणा केली. न्याहारी, जेवण, पाणी मिळाले असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच सुरक्षेत कोणत्याही प्रकारची ढिलाई नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
रांगेत थांबून मतदान
पोलीस आयुक्त चौबे यांनी गहुंजे येथील शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी रांगेत उभे राहून मतदान केले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत पुणे शहर, शिरूर आणि मावळ, बारामती लोकसभा मतदारसंघांच्या काही भागाचा समावेश आहे. सोमवारी (१३ मे) चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली. आयुक्त चौबे हे गहुंजे येथील शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी पहिल्या टप्प्यात मतदान करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी या केंद्रावर काही मतदार रांगेत होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.