Pimpri Chinchwad Police: लाचप्रकरणानंतर एसीपी मुगुट पाटील यांना ‘अभियान’

पिंपरी-चिंचवड: लाच प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील यांचे नाव आल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली होती. त्यानंतर मुगुट पाटील यांची ‘अभियान’च्या सहायक आयुक्तपदी

Pimpri Chinchwad Police

संग्रहित छायाचित्र

पाटील यांची बदली; तर एक फौजदार निलंबित, एकाला नियंत्रण कक्षात संलग्न

पिंपरी-चिंचवड: लाच प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील यांचे नाव आल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली होती. त्यानंतर मुगुट पाटील यांची ‘अभियान’च्या सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे, तर एका फौजदाराला निलंबित करून, सहायक निरीक्षकाला नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले आहे. देहूरोड विभागाचा अतिरिक्त कार्यभार सहायक पोलीस आयुक्त डाॅ. विशाल हिरे यांच्याकडे देण्यात आला आहे. (Pimpri Chinchwad Police)

जमिनीच्या संदर्भात तक्रार अर्ज आल्यानंतर या प्रकरणात पाच लाखांची लाच मागण्यात आली होती. त्यातील एक लाख रुपये स्वीकारताना एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पुण्यात पकडले होते. देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील (Mugut Patil) यांच्या सांगण्यावरून लाच मागितल्याचे खासगी व्यक्तीने ‘एसीबी’ ला सांगितले. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली. मात्र, लाचप्रकरणात सहायक पोलीस आयुक्तांचे नाव आल्याने राज्यात खळबळ उडाली होती.

एसीबीने कारवाई केलेल्या प्रकरणात नाव आल्याने पाटील यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत देहूरोड पोलीस ठाणे जिल्ह्यात विविध कारणांनी चर्चेत आहे. गुन्हे शाखेने सलग दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापा मारून लोकांना अटक केली होती. तर गांजा बाळगल्याच्या खोट्या गुन्ह्यात एका विद्यार्थ्याला अडकवण्यासाठी त्याचे अपहरण आणि खंडणी मागितल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या दोघा पोलिसांचा सहभाग उघड झाला होता. त्यामुळे त्या दोघांना निलंबित करण्यात आले. मात्र, तपास पथकात कार्यरत असलेले हे दोघे सध्या फरार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देहूरोड पोलीस ठाण्याचा कारभार सहायक निरीक्षक वसंत देवकाते यांच्याकडे होता. मागील आठ दिवसात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर देवकाते यांना पोलीस नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. मात्र, प्रशासकीय कारणासाठी ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे देहूरोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे प्रमुख असणारे उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांना निलंबित करण्यात आले आहे. गांजा प्रकरणात त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग, गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर केलेली कारवाई, अन्य एका गुन्ह्यांच्या तपासात दुर्लक्ष अशी कारणे सांगत धोत्रे यांना निलंबित करण्यात आले आहे.

हिरेंची चमक...

वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डाॅ. विशाल हिरे यांच्याकडे देहूरोड विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. यापूर्वी डाॅ. हिरे यांच्याकडे चिंचवड विभागाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. त्यानुसार डाॅ. हिरे यांच्याकडे सध्या वाकड, चिंचवड तसेच देहूरोड या तीन विभागांचा पदभार आहे. पोलीस उपायुक्तांच्या अखत्यारित केवळ दोन विभगांचा कार्यभार असतो. मात्र, हिरे यांच्याकडे पोलीस उपायुक्त यांच्यापेक्षा अधिकचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest