पिंपरी-चिंचवड : तारांगण सुरू, पण संकेतस्थळावर बंद!
पिंपरी-चिंचवडमध्ये सायन्स पार्कमध्ये (Science Park) तारांगण उभारले असून ते दुरुस्तीच्या कामासाठी गेल्या दहा दिवसांपासून बंद होते. शालेय सुट्टीचा कालावधी सुरू असताना तारांगण बंद असल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड झाला होता. त्याबाबत नागरिकांनी तक्रारीदेखील केल्या होत्या. अखेर शुक्रवारपासून तारांगणाचा शो सुरू करण्यात आला. मात्र सायन्स पार्कच्या संकेतस्थळावर तारांगण बंद असल्याची सूचना दर्शवली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Pimpri Chinchwad Crime)
वर्षभरापूर्वीच हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. ऐन शालेय सुट्टीच्या कालावधीत तारांगण पाहण्यास येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होत असून नागरिक येथून परत जात आहेत. सुट्टीच्या कालावधीत तारांगण पाहायला जास्त गर्दी होत असते. ऐन सुट्टीच्या कालावधीत तारांगणचे दुरुस्तीचे काम काढण्यात आले आणि अवकाळी पावसामुळे तारांगणचे छत गळू लागले. त्यामुळे तारांगण दुरुस्तीसाठी आणखी काही दिवस बंद ठेवण्यात आले. सुट्टीच्या दिवशी राज्याच्या विविध भागातील पर्यटक तारांगण व सायन्स पार्क पाहण्यासाठी येतात. सध्या त्यांना बंदची सूचना पाहून परत जावे लागत होते.
पिंपरी-चिंचवड येथील तारांगणचे गेल्या वर्षी १५ मे रोजी उद्घाटन झाले. तेव्हापासून दररोज तारांगण पाहण्यास गर्दी होत आहे. तारांगणमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत दररोज सहा शो दाखविले जातात.
ऑप्टोमेकॅनिकल व डिजिटल पद्धतीच्या माध्यमातून हायब्रिड प्रोजेक्शन पद्धतीने अत्याधुनिक तारांगण विकसित केलेले आहे. खगोल विज्ञानातील १७ वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाच्या व्हीडीओ जपान येथील गोटो कंपनीच्या साहाय्याने तयार केल्या आहेत. या प्रकल्पामुळे विविध लहान-मोठे तारे स्पष्टपणे पाहता येतात. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा अवलंब करण्यात आला आहे. तारांगणासाठी आवश्यक प्रोजेक्टर, डोम उभारण्यात आले आहे. तारांगणाचा शो सुरू करण्यात आला. आज सकाळीच त्याची ट्रायल घेण्यात आली. तसेच, पाऊस नसल्याने हे खुले करण्यात आले आहे. वार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असून, तारांगण सुरू करून कामदेखील सुरू करण्यात आले आहे. डोममधील दोन काचांमध्ये डांबरासारखे एक सोल्युशन लावलेले असते. ते उन्हामुळे पातळ होते, त्यामुळे डोमचे छत पावसामुळे गळू लागते होते. मात्र आता तारांगण सुरू झाले आहे. ऑनलाइन बंदची सूचना काढण्याचे कळवण्यात आले आहे, अशी माहिती सायन्स पार्कचे नंदकुमार कासार यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.