संग्रहित छायाचित्र
वाहनातील वेगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच, वाहतुकीची शिस्त लावण्याबाबत राज्य शासनाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील आयटीएमएस सिस्टीमचे काम पूर्ण झाले असून, वाहतूक नियमांचे पालन न करणारे वाहनचालक दंडात्मक कारवाईला पात्र ठरणार आहेत. 'आयटीएमएस'मुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. आत्तापर्यंत जवळपास पाच लाखाहून अधिक वाहनांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वाहन चालकाचे समुपदेशनदेखील सुरू असल्याची माहिती आरटीओच्या वतीने देण्यात आली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघाताची सुरक्षा विचारात घेऊन अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने संपूर्ण ९० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर आयटीएमएस प्रणाली बसवण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वी हाती घेतले होते. ते सध्या पूर्ण झाले असून ही पद्धत नुकतीच सुरू केली आहे. आयटीएमएस म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम असून, राज्य शासन आणि पिंपरी चिंचवड, पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयअंतर्गत यावर नियंत्रण राहणार आहे. याबाबत दोन्ही विभागांचे प्रत्येकी एक साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यावरती देखरेख ठेवत आहेत.
सॅटेलाईटद्वारे संपूर्ण माहिती नियंत्रण कक्षाला तत्काळ कळते. यासाठी ९० किलोमीटर अंतरावरच्या रस्त्यावर संभाव्य अपघातग्रस्त १०६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे सर्व कॅमेरे आयटीएमएस पद्धतीने सॅटेलाईटद्वारे कुसगाव येथील नियंत्रण कक्षाला जोडले आहेत. या पद्धतीमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या सर्व हालचालींची माहिती कॅमेऱ्यात कैद होते. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन न करणारे, अतिवेगाने वाहन चालवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, लेन कटिंग आदींसह अपघात झाला किंवा कोणतीही घटना घडली तर याची माहिती नियंत्रण कक्षाला तत्काळ कळते.
त्यामुळे काही मिनिटांत अपघातग्रस्तांना मदत पुरवणे शक्य झाले आहे. या प्रणालीमुळे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांना दंडाचा भुर्दंड बसत असून, वाहन प्रकारानुसार किमान पाचशे ते दोन हजार रुपये दंड हा भरावा लागत आहे.
याबाबत संबंधित वाहनाचा फोटो नियंत्रक कक्ष प्राप्त होतो. त्यानंतर त्याची खातरजमा करून आरटीओच्या माध्यमातून त्याबाबत वाहनचालकांना चलन प्राप्त होते. याचबरोबर रस्त्यावरती धावणाऱ्या वाहनचालकांना आवश्यक ते समुपदेशनदेखील आरटीओच्या वतीने देण्यात येत आहे. यासाठी एक स्वतंत्र पथकदेखील तैनात आहे. त्या अनुषंगाने काम सुरू आहे.
नियमाचे उल्लंघन, दंडाची पावती
द्रुतगती मार्गावर बोरघाटात वेग मर्यादेचा विसर पडलेले वाहनचालक रस्ता मोकळा असल्यास वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सुसाट जातात, याची नोंद नियंत्रण कक्षाला होत असते. नियंत्रण कक्षाकडून यांची संपूर्ण माहिती आरटीओ व विशेष दंडात्मक कारवाई करणाऱ्या पथकाकडे जाते. त्यांच्यामार्फत नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकास दंडाचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे नियमाच्या उल्लंघनाप्रमाणेच वेगावरदेखील नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनचालकांचे नियमांचे पालन करण्याकडे कल वाढला आहे. जून महिन्यापासून म्हणजेच जवळपास पाच महिन्यात जवळपास पाच लाख वाहनांवर दंड करण्यात आला आहे. द्रुतगती मार्गावर जाताना २० आणि येताना १९ अशा ३९ एन्ट्री आहेत. त्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे - राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी