पिंपरी-चिंचवड: दाखल्यांसाठी पालकांचे हेलपाटे - सततच्या सर्व्हर डाऊनमुळे वाढल्या अडचणी, शासनाचे त्या सुविधा केंद्राकडे दुर्लक्षच

येत्या जून महिन्यापूर्वी शालेय प्रवेशाच्या आवश्यक दाखल्यांसाठी पालकांची धावपळ सुरू आहे. 'आरटीई'साठी आवश्यक असणारे उत्पन्न दाखले मिळण्यासाठी अर्ज दाखल होत आहेत. मात्र निगडी येथील सेतू कार्यालयातील सर्व्हर गेल्या आठवड्यापासून डाऊन होत आहे.

दाखल्यांसाठी पालकांचे हेलपाटे

पंकज खोले - 

येत्या जून महिन्यापूर्वी शालेय प्रवेशाच्या आवश्यक दाखल्यांसाठी पालकांची धावपळ सुरू आहे. 'आरटीई'साठी आवश्यक असणारे उत्पन्न दाखले मिळण्यासाठी अर्ज दाखल होत आहेत. मात्र निगडी येथील सेतू कार्यालयातील सर्व्हर गेल्या आठवड्यापासून डाऊन होत आहे. विशेष म्हणजे ते शासनाचे स्वतंत्र केंद्र असल्याने तहसील कार्यालयाकडून त्याबाबत अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेमकी तक्रार करायची तरी कोठे, असा प्रश्न अर्जदारांना पडला आहे.

उत्पन्नाच्या दाखल्यासह विविध दाखले मिळण्यास उशीर होत आहे. परिणामी, दाखल्यांसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे. सध्या आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दाखले काढण्यासाठी निगडी येथील तहसील कार्यालयाच्या सेतूमध्ये दाखल्यांसाठी मोठी गर्दी होत आहे. दाखले लवकर न मिळाल्यामुळे पालक प्रवेशाबाबत चिंता व्यक्त करत आहे. सध्या आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी विविध दाखले मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. उत्पन्न दाखला, डोमिसाईल दाखला, त्याचप्रमाणे जातीच्या दाखल्याचे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत आहेत. निगडी येथील सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दिवसासाठी २५० उत्पन्नाच्या दाखल्यांचे वितरण होत आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून दाखले वाटपाची संथ गती असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

'सर्व्हर डाऊन'ची सातत्याने समस्या उद्भवत आहे. तांत्रिक कारणाअभावी अर्ज दाखल करून घेता येत नाहीत. नागरिकांना माघारी पाठवावे लागत आहे. तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे दाखले मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र तांत्रिक अडथळ्यांमुळे नागरिकांना कसरत करावी लागत आहे. सर्वर डाऊनबाबत केवळ पत्रव्यवहार करण्याचा सोपस्कार तहसील कार्यालयाच्या वतीने होत आहे.

सेतू कार्यालयातील कर्मचारी गैरहजर

निगडी येथील सेतू कार्यालयात विविध दाखल्यांचे अर्ज प्राप्त करून घेतात. त्यानंतर ठराविक दिवशी त्यांना दाखल्यांचे वाटप केले जाते. सध्या शालेय प्रवेश प्रक्रियेमुळे अर्जदारांची मोठी गर्दी होत आहे. या कार्यालयाचा कारभार नव्या कंपनीकडे देण्यात आला. मात्र ऐन दाखल्यांच्या हंगामात या कार्यालयातील कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले.

दाखले काढण्यासाठी वारंवार हेलपाटे मारत आहे. मात्र लवकर दाखला दिला जात नाही. सकाळी ११ वाजता कार्यालयात आलो. दुपारी अडीचपर्यंत काम झाले नाही. पावतीदेखील देत नसल्याने ताटकळत थांबावे लागले.
- सचिन जाधव, अर्जदार, पिंपरी

सर्व्हर डाऊन होत असलेल्या तक्रारी येत आहेत. त्याबाबत आम्ही संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करतो. दाखले त्वरित पालकांना मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
-प्रशांत ढमाले, नायब तहसीलदार, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest