इंद्रायणी प्रदूषणाबाबत विरोधक एकवटले
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आळंदीतील सिद्धबेट येथे गुरुवारी (४ जुलै) विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणात एकवटले होते. यात स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, वारकरी, विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेत, टाळ मृदंग वाजवत इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात 'गजर' केला. भर पावसात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत वारकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला.
शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षभरापासून इंद्रायणी अक्षरशः फेसाळलेली आहे. तेलकट तवंग दररोज पाण्यावर पसरलेला असतो. याबाबत स्थानिक प्रशासनापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करूनही तोडगा निघालेला नाही. नुकतीच आषाढी पालखी वारी आळंदीतून निघाली. या वारी सोहळ्यासाठी आलेल्या लाखो भाविकांना प्रदूषित इंद्रायणीचे फेसाळलेले पाणी 'तिर्थ' म्हणून घ्यावे लागले आहे. यामुळे वारकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या. या भावना सत्ताधाऱ्यांना, राज्यकर्त्यांना कळाव्यात, यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने एल्गार आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी आळंदीतील सिद्ध बेट या ठिकाणी झालेल्या आंदोलनाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) काँग्रेस यासह वारकरी व स्थानिक नागरिकांनी देखील उपस्थिती लावली. पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक, त्याचप्रमाणे महिला आघाडी सहभागी झाले होते.
सुलभा उबाळे म्हणाल्या की, नदीची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. नदीत मोठ्या प्रमाणात वाहून आलेली जलपर्णी, त्या जलपर्णीमुळे तेथील पाण्यातील जलचर प्राण्यांचे जीव धोक्यात आला आहे. नदीकाठच्या गावातील व महापालिकेचे मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत जाते. मात्र दुसरीकडे ट्रीटमेंट प्लांटच्या नावाखाली स्थानिक नेत्यांच्या बगलबच्चांना कोट्यवधींचे ठेके देण्यात आलेले आहेत. शहरातील अनेक कारखान्यातील केमिकलयुक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट ते सांडपाणी नदीपात्रात सोडल्याने, त्याचा काहीसा रंग बदलून पिवळसर झालेला आणि ते जलप्रदूषित पाणी बंधाऱ्यातून खाली पडते. भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनाकरीता हजारो भाविक येत असतात. तसेच ते इंद्रायणीकाठी येऊन स्नान करतात तसेच पवित्र जल तीर्थ म्हणून प्राशन करतात. त्यामुळे नदीमध्ये स्नान केल्याने त्वचारोग व तीर्थ म्हणून प्यायल्याने ते आरोग्यास हानिकारक होऊ शकते. जलप्रदूषणामुळे नदीकाठच्या गावातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात इंद्रायणी जलप्रदूषणामुळे केळगावातील नागरिकांना अशुद्ध (काळसर रंग) पाण्याचा पुरवठा झाला होता. स्नान करण्यासाठीही अयोग्य असा पाणीपुरवठा त्यावेळी झाला होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे जलप्रदूषण रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली नाही. त्याला शासन जबाबदार आहे. तसेच या जलप्रदूषणावर आळा बसण्यासाठी जलप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्कता आहे.
नदीच्या काठावर काही ठिकाणी भराव टाकण्यात आले आहेत. अनेकांची हॉटेल इंद्रायणीकाठी आहेत, त्याचे सांडपाणी व मैलामिश्रित पाणी नदीत सोडणे बंद करावे.
स्वच्छतेच्या नावाखाली भ्रष्टाचार
दरवर्षी जलपर्णी काढणे ,नाल्यांची सफाई, ट्रीटमेंट प्लांट, रिव्हर सायक्लोथॉन असे विविध प्रकार उपयोजना केल्या आहेत. या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्यामुळेच इंद्रायणीची आज गटारगंगा झाली आहे, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही आंदोलनात करण्यात आली.
...या आहेत मागण्या
माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, वर्षभर इंद्रायणी नदीचे पाणी स्वच्छ राहील. घोषणा हवेतच विरली आहे. इंद्रायणीचे पाणी अजूनही अस्वच्छ आहे. करोडो रुपयांचा खर्च होऊनसुद्धा जर आमच्या वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या इंद्रायणीला मोकळा श्वास घेता येत नसेल तर नक्की हा पैसा जातो कुठे? याचे उत्तर आता मिळाले पाहिजे. नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली 'नमामि इंद्रायणी' चे खोटे गाजर किती दिवस दाखवणार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.