संग्रहित छायाचित्र
पंकज खोले
रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) कारवाई करत आहे. विशेष म्हणजे कारवाईत दीड हजार बसचालकांची तपासणी केली. ‘ब्रेथ ॲनालायझर’द्वारे तपासणी करताना अडीच वर्षात केवळ एकच वाहनचालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे ही कारवाई आरटीओच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत करण्यात आली होती.
आरटीओकडून विविध महामार्गांवर जादा वेग, सीटबेल्ट नसणे, ओव्हरलोड, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते. तसेच ‘ब्रेथ ॲनालायझर’द्वारे तपासणी करून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई केली जाते. शहरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस, आरटीओ आणि महामार्ग पोलिसांकडून कारवाई केली जाते. वाहनचालकांची चुकी, दारू प्राशन करून वाहन चालवणे, अशा प्रकरणात कारवाई केली जाते. शहरात वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात कारवाई करतात. तुलनेने आरटीओ विभाग त्या वेगात कारवाई करताना दिसून येत नाही. पिंपरी चिंचवड आरटीओने जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२४ दरम्यान १ हजार ४५५ वाहनचालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली. यात केवळ एकच चालक दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे आढळून आले. अवजड सामानाची वाहतूक करणारे वाहनचालक सर्रास दारू पिऊन वाहन चालवताना दिसून येते. आरटीओकडून केलेल्या कारवाईत केवळ एकच वाहनचालक ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’प्रकरणी दोषी आढळल्याची नोंद आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.