संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
आकुर्डी खंडोबा माळ चौकात सिग्नल शेजारील इमारतीवर धोकादायक पध्दतीने होर्डिंग उभारले होते. त्या होर्डिंगखाली सूचनाफलक लावले होते. होर्डिंग खाली कोणी उभारू नये, इजा व जीवितहानी झाल्यास आमची जबाबदारी नाही, असा फलक लावला होता. याबाबत 'सीविक मिरर'चे वृत्त प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासनाने सिग्नलवर होर्डिंग स्ट्रक्चरसह सूचनाफलक तत्काळ हटवण्याचे आदेश संबंधित होर्डिंगधारकास दिले आहेत.
आकुर्डी खंडोबा माळ चौकात सतत गजबजलेला असतो. आयनाॅक्स चित्रपटगृहाकडून आलेल्या रोडवर सिग्नल शेजारील इमारतीवर महापालिकेकडून परवाना घेऊन होर्डिंग उभारले आहेत. मात्र, होर्डिंगच्या मालकाने स्ट्रक्चरखाली नागरिकांसाठी सूचनाफलक लावला होता. होर्डिंगखाली कोणीही उभे राहू नये, काही इजा व जीवितहानी झाल्यास आमची जबाबदारी नाही, असा फलक लावला होता. संबंधित होर्डिंग मालकाने सदरचे होर्डिंग स्ट्रक्चर धोकादायक पध्दतीने सिग्नलवर उभारले होते. दर एक-दोन सेकंदाला शेकडो टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहने त्या सिग्नलवर थांबलेले असतात.
वादळी वाऱ्यात चुकून जरी हे होर्डिंगचे स्ट्रक्चर त्या सिग्नलवरील रस्त्यावर पडले तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तीय हानी होऊ शकते. तरीही होर्डिंग मालकाने सूचनाफलक लावून होर्डिंग पडले तर आमची जबाबदारी नाही, असे म्हटले होते. त्यामुळे सिग्नलवर होर्डिंग पडले तर मालकाची की महापालिकेची जबाबदारी? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले होते. दरम्यान, संबंधित होर्डिंग मालकाने सूचनाफलक लावून थेट जबाबदारी झटकली होती. यावर महापालिकेच्या आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित होर्डिंगचे स्ट्रक्चर आणि नागरिकांचे सूचना फलक तत्काळ हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून आकुर्डी चौकात सिग्नलवर धोकादायक पध्दतीने इमारतीच्या भिंतीवर लावलेले होर्डिंग स्ट्रक्चर आणि सूचना फलक हटवण्यासाठी संबंधित होर्डिंगमालकाला आदेश दिले आहेत.
पावसाळ्याच्या सुरुवातीस वादळ, वारा मोठ्या प्रमाणावर येत असतो. वादळ वाऱ्याने कुजलेली, गंजलेली, कमकुवत जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर पडून जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याची शक्यता आहे. होर्डिंग स्ट्रक्चर पडून जीवित, वित्तहानी झाल्यास त्याला जाहिरात फलकधारकास जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यानुसार आकुर्डी चौकातील सिग्नलवरचे धोकादायक होर्डिंग स्ट्रक्चर आणि नागरिकांचे सूचनाफलक काढण्यात आले आहे.
- चंद्रकांत इंदलकर , सह-आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.