Pimpri Chinchwad News: कामे निगडीतील, कंपनी गुजरातची!

पिंपरी-चिंचवड: शहरातील नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्र देण्यासाठी सुरू केलेल्या निगडीतील सेतू सुविधा केंद्राचा (Nigdi Setu Office) ताबा गुजरात इन्फोटेक (Gujrat Infotech) या कंपनीला तहसील विभागाने दिला आहे.

Nigdi Setu Office

कामे निगडीतील, कंपनी गुजरातची!

दाखले, प्रमाणपत्रासाठी निगडीत सुरू असलेल्या सेतू सुविधा केंद्राचा ठेका ‘गुजरात इन्फोटेक’ला; यामुळे स्थानिक रोजगार आता गुजरातच्या हाती जाणार

पिंपरी-चिंचवड: शहरातील नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्र देण्यासाठी सुरू केलेल्या निगडीतील सेतू सुविधा केंद्राचा (Nigdi Setu Office) ताबा गुजरात इन्फोटेक (Gujrat Infotech) या कंपनीला तहसील विभागाने दिला आहे. सध्याच्या ठेकेदाराचे कर्मचारी काम व्यवस्थित करत नसल्याच्या तक्रारी आल्याने आणि ठेक्याचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे वरील निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यामुळे स्थानिकांचा रोजगार हिसकावून तो थेट गुजराती लोकांच्या हाती जाणार आहे. (Pimpri Chinchwad News)

पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाअंतर्गत निगडीतील सेतू कार्यालयाचे कामकाज चालते. पिंपरी-चिंचवड शहरासह देहू, चिखली, तळवडे या परिसरातून नागरिक, विद्यार्थी दाखले काढण्यासाठी येथे येत असतात. या ठिकाणी अर्ज केल्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये तहसील कार्यालयामार्फत अर्जदारांना दाखले मिळतात. मात्र, ठराविक रकमेपेक्षा अधिक रक्कम घेतली जात असल्याच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत.

पूर्वी हे कार्यालय तहसील कार्यालयासोबत तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीत होते. मात्र पीएमआरडीएने इमारतीचा ताबा घेतल्यानंतर तहसील कार्यालयातील या कार्यालयास आपला मुक्काम हलवावा लागला. त्यामुळे सेतू सुविधा केंद्रदेखील तहसील कार्यालयाबरोबर स्थलांतरित झाले. दरम्यान, गेली पाच-सहा वर्ष व्यवस्थित कारभार सुरू असलेल्या या सुविधा केंद्राचा ठेका काढून घेण्यात आला आहे. त्यानुसार या ठिकाणी नव्या ठेकेदाराला ते काम देण्यात आले आहे. ही कंपनी पुणे जिल्ह्याबाहेर असल्याने स्थानिकांचे काम काढून गुजरातमधील कंपनीला दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. 

सध्या सुरू असलेल्या सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्याकडून काम काढून घेतलं असल्याचे बोलले जात आहे. मात्र यापूर्वी काढून टाकण्यात आलेले कर्मचारी पुन्हा या ठिकाणी दिसून आल्याने नेमके या पाठीमागील ‘अर्थ’कारण दिसून येते असे बोलले जाते. 

कर्मचारी बदलावेत

नव्या ठेकेदारास दाखल्याचे काम दिल्यानंतर त्यांना हस्तांतरित करण्याचे पत्र तहसील कार्यालयाने आत्ताचा ठेका असलेल्या कंपनीला देण्यात आले आहे. तसेच, जुने कर्मचारी नको, त्याऐवजी नवीन कर्मचारी या ठिकाणी नेमावेत असेही सुचवण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कारवाईत पकडलेल्या एकाला पुन्हा या ठिकाणी रुजू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

अद्याप घेतला नाही ताबा

सेतू कार्यालयाचे कामकाज गुजरात इन्फोटेक कंपनीला देण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यांनी केंद्राचा ताबा घेतला नाही. परिणामी, अधिकार वर्गाकडून जुन्या व आता सुरू असल्यास ठेकेदाराला त्रास देण्याचे काम सुरू असून, दाखले अडवून ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

... अन् तक्रार करायला लावली

सेतू कार्यालयातील नको असलेल्या काही कर्मचाऱ्यांची एका विशेष व्यक्तीच्या माध्यमातून दाखल्याबाबत तक्रार करायला लावली असून, तसेच सेतू कार्यालयात अनेक तक्रारी असल्याचे दाखवत अडचणी आणल्या जात आहेत. या माध्यमातून नव्या कर्मचाऱ्यांना केंद्रात घुसवले जात आहे.

पिळवणूक थांबणार?

शहरातील नागरिकांना दाखले मिळण्यासाठी  अनेक हेलपाटे मारावे लागतात. कागदपत्रे नसल्याचे सांगून अडवणूक केली जाते. त्यामुळे या नव्या बदलामुळे नागरिकांची ही पिळवणूक थांबेल का, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

पुण्यातील एका केंद्राचा ठेका

पुणे शहर अंतर्गत दाखले, प्रमाणपत्र देण्याचे काम गुजरात इन्फोटेक कंपनी पाहते. नाशिक कनेक्शन असलेल्या या कंपनीला आता पिंपरी चिंचवड सेतू केंद्राचा कारभार देण्यात येणार आहे. मात्र, सद्यस्थितीत जुने काही सोडेना, नवीन काही येईना, यानुसार हे तात्पुरते दाखल्यांचे काम सुरू आहे. 

निगडी येथील सेतू सुविधा केंद्र दुसऱ्या कंपनीला चालवण्यासाठी देण्यात येणार आहे. त्याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.

- प्रवीण ढमाले, नायब तहसीलदार

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest