Pimpri Chinchwad News: चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्थानकांचा कायापालट

पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन माध्यमातून झाले.

संग्रहित छायाचित्र

'अमृत भारत' च्या दुसऱ्या टप्प्याचे पंतप्रधानांचे हस्ते भूमिपूजन, स्थानकांच्या आधुनिकीकरणासह प्रवाशांच्या सुविधांतही होणार वाढ

पंकज खोले

पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन माध्यमातून झाले. तसेच शेलारवाडी, जांभूळ, कामशेत या ठिकाणी बांधलेल्या अंडरपास पुलाचे उद्धाटन व पोल क्र.४७ मळवली स्टेशनजवळ अंडरपासच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ऑनलाइन सहभागी झाले होते.  रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने 'अमृत भारत' स्टेशन ही योजना हाती घेतली आहे. स्थानकाचे विस्तारीकरण, सुशोभीकरण व्हावे, प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी हा बदल केला जाणार आहे. चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव दाभाडे या चार रेल्वे स्थानकांचा योजनेत समावेश झाला होता. त्यातील पहिल्या टप्प्यातील आकुर्डी आणि तळेगाव दाभाडे या स्टेशनच्या विस्तारीकरण, सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.

आता अमृत भारत योजना दोन अंतर्गत चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्टेशन नूतनीकरण व सुधारणेचे काम हाती घेतले आहे.  तसेच शेलारवाडी, जांभूळ व कामशेत या ठिकाणी बांधलेल्या अंडरपास पुलाचे उद्धाटन व पोल क्र. ४७ मळवली स्टेशनजवळ अंडरपास या कामाचे भूमिपूजन झाले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्टेशनचा विस्तार केला जात आहे. प्रवाशांना विविध सुविधा दिल्या जात आहेत. रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण केले जात आहे. पनवेल रेल्वे स्टेशनचा नव्याने विकास आराखडा (डीपीआर) होत आहे. ट्रॅक वाढवले जात आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा दिला जात आहे.

विस्तारीकरणात काय होणार ?

रेल्वे स्थानकावर  फुटओव्हर ब्रीज, प्रशस्त व नवी प्रतीक्षा रूम, प्रत्येक फलटावर अत्याधुनिक स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, सिग्नल, दिव्यांगासाठी सोयी-सुविधा, पर्यावरण पूरक वातावरण, आवश्यकतेनुसार ४ लिफ्ट, २ सरकता जिना, मोफत वाय-फाय,  साफसफाई, अत्याधुनिक सूचना प्रणाली, वाहनतळासाठी जागा, शेड उपलब्ध करून दिले जाणार असून रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार आहे.

शहरातील प्रमुख स्थानकांचा नव्याने सुधारणा होणार ही चांगली बाब आहे. त्यासोबतच लांब पल्ल्याच्या व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेसला या ठिकाणी थांबा द्यावा. जेणेकरून प्रवासी संख्या आणखीन वाढू शकेल. सध्या चिंचवड स्थानकावरून दिवसाकाठी ९ ते १० हजार नागरी प्रवास करतात. सुविधा दिल्याने ती संख्या वाढू शकेल.

-इक्बाल मुलानी, अध्यक्ष रेल्वे प्रवासी संघ, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest