Pimpri Chinchwad News: रस्ते लहान, पदपथ मोठे, पादचाऱ्यांनी चालायचे कोठे ?

पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्याच्या तुलनेने पदपथावर वारेमाप खर्च होत आहे. अजूनही जुने पदपथ मोडून-तोडून तेथे लांबलचक पदपथ उभारण्यात येत आहेत. मात्र, हे दुकानदार व वाहनचालकांच्या पार्किंगसाठी उभारले की काय,

रस्ते लहान, पदपथ मोठे, पादचाऱ्यांनी चालायचे कोठे ?

लांबलचक पदपथावर पार्किंग आणि दुकाने! प्रशासनाकडे दाद मिळत नसल्याने नागरिकांनी व्यक्त केली सोशल मीडियावर खदखद

पंकज खोले
पिंपरी-चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad) रस्त्याच्या तुलनेने पदपथावर वारेमाप खर्च होत आहे. अजूनही जुने पदपथ मोडून-तोडून तेथे लांबलचक पदपथ उभारण्यात येत आहेत. मात्र, हे दुकानदार व वाहनचालकांच्या पार्किंगसाठी उभारले की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. अनेकदा तक्रारी करूनही महापालिका कारवाई करत नसल्याने, निगडी, प्राधिकरण, रावेत व किवळे सोसायटीतील नागरिकांनी थेट सोशल मीडियावर कारवाईची मागणी करत दाद मागितली आहे.

उपनगरांमधील विविध भागांमध्ये पदपथांवर वाहने पार्क करण्यात आली असून, वाहने पदपथावर आणि नागरिक रस्त्यावर अशी स्थिती असून, याबाबत या परिसरातील नागरिकांनी तक्रार करण्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वाढत असतानाच वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी पार्किंगचा प्रश्न उद्भवत असून नागरिक जेथे जागा मिळेल, तेथे वाहने पार्क करतात. त्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे नागरिकांना अनेकदा पदपथ सोडून रस्त्यावर जीव मुठीत धरून पायी चालावे लागते. वाहने पार्किंग, दुकानांचे फलक, विक्रीसाठी आणलेल्या विविध वस्तू, ज्यूस सेंटर, स्नॅक्स सेंटर, वडापाव गाड्यांची हातगाड्या या ठिकाणी लावल्या जात आहेत.

रावेत, किवळे परिसरात ठिकठिकाणी पदपथावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून, चालणे अवघड झाले आहे. रावेतमध्ये भोंडवे कॉर्नरला पालिकेने नागरिकांना चालण्यासाठी पदपथ तसेच सायकल ट्रॅक बांधला आहे. मात्र, सर्वच ठिकाणी विविध प्रकारची अतिक्रमणे तसेच वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय राहात नाही. रहाटणी, काळेवाडी व पिंपळे सौदागर परिसरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील पदपथ मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाने व्यापले आहेत. विशेष म्हणजे या पदपथांचा पार्किंगसाठी सर्रास वापर होतो. त्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागते. वाकड, थेरगाव, चिखली, आकुर्डी, निगडी परिसरातील पदपथांची हीच स्थिती आहे. सांगवी येथील पदपथांवर फळ विक्रेते, भाजी विक्रेते उभे असतात.

महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी म्हणतात, पदपथांवरील अतिक्रमणांवर आमची कारवाई नियमितपणे सुरू असते. मात्र, कारवाईसाठी पथक येण्यापूर्वीच विक्रेते गायब होतात. पथकाची पाठ फिरल्यानंतर पुन्हा जैसे-थे परिस्थिती निर्माण होते. गेल्या दहा वर्षांपासून हॉकर्स झोन ‘सर्वेक्षण, नोंदी आणि पुन्हा सर्वेक्षण’ या चक्रव्यूहात अडकले आहे. त्यावर कार्यवाही होऊन हॉकर्स झोनची निर्मिती व्हावी. यामुळे फेरीवाले, पथारीवाल्यांची सोय होईल. पण, दुकानांसमोर अतिक्रमण करणाऱ्या स्थायी विक्रेत्यांवर ठोस कारवाई करण्याची गरज आहे. 

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत आवाज उठवल्यानंतर शहराच्या विविध परिसरातील नागरिकांनीही फोटोसहीत अशाप्रकारे सर्वच ठिकाणी होत असलेल्या अतिक्रमणाला वाचा फोडली आहे. सारथी ॲपवर तक्रार करूनही उपयोग होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

आधी निवारणाचे आश्वासन नंतर वाहतूक विभागाकडे टोलवाटोलवी

रावेत परिसरातील पदपथावरील वाहने व वाढते अतिक्रमण याबाबत महापालिकेच्या सारथी ॲपवर आठ दिवसांपूर्वी तक्रार देण्यात आली होती. मात्र, ती तक्रार समजून घेऊन सोडवण्याऐवजी ती रिजेक्ट करण्यात आली. ३ मार्चपर्यंत तक्रारीचे निवारण करण्यात येईल, असे कळवण्यात आले होते. मात्र, त्यावरती संबंधित तक्रार आणि समस्या ही वाहतूकविषयक असल्याने वाहतूक पोलिसांकडे तक्रार करण्याची सूचना 'सारथी'कडून तक्रारदाराला करण्यात आली आहे.

 

पदपथावरील अतिक्रमण व अनधिकृत पार्किंगबाबत महापालिकेकडे तक्रार केली आहे. त्यावर कठोर कारवाईची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.

- प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्ष, रावेत-किवळे सोसायटी फेडरेशन

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest