संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड: महापालिकेकडून बोऱ्हाडेवाडीतील विनायकनगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून पायाचा चौथरा ४० टक्के बांधल्यावर आता पुतळ्याची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कररूपी जनतेच्या पैशाची स्थापत्य अधिका-याकडून उधळपट्टी सुरू असून चौथऱ्यासाठी केलेला पाच कोटींचा खर्च पाण्यात जाण्याची दाट शक्यता आहे. आता हा खर्च अधिकारी, ठेकेदारांकडून वसूल करण्याची मागणी होत आहे.
विनायकनगर (मोशी) येथे १४० फूट उंच छत्रपती संभाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा भव्य पुतळा उभारण्याचे नियोजन केले. चौथऱ्याच्या कामाची निविदा राबवून मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन ठेकेदाराला सन २०२० मध्ये काम दिले. १२ कोटी ५० लाखांच्या या कामाची मुदत दीड वर्षे होती.
वेळेत काम न झाल्याने ठेकेदाराला ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली. आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. छत्रपती संभाजी महाराज व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा बनविण्याचे काम दिल्लीत प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार करीत आहेत.
विनायकनगर येथे ४० टक्के चौथ-याचे काम झाले असताना ऐनवेळी स्थानिक आमदारांनी पुतळ्याची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुतळा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मोशी सेक्टर क्रमांक पाच व आठ येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी उभारण्याची मागणी महापालिकेकडे केली.
तसेच तेथे पुतळा उभारण्यासाठी जागेची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार पीएमआरडीएने अडीच एकर जागा महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. त्यामुळे तेथे पुतळा उभारण्यात येणार आहे. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या पुतळ्याची जागा बदलण्याच्या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.
पुतळ्यासाठी ६० कोटींचा खर्च
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फूट उंचीचा कांस्य धातूचा पुतळा असणार आहे. त्यासाठी ३२ कोटी ६६ लाख खर्च अपेक्षित आहे. पुतळ्याच्या ४० फूट उंचीच्या चौथऱ्याचा खर्च १२ कोटी ५० लाख इतका आहे. तसेच, त्या ठिकाणी संभाजी महाराज सृष्टी उभारून आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. त्यासाठी १५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. स्मारकाचा एकूण खर्च ६० कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.
दर्शनी भागात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी स्थळ बदलले आहे. मोशी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र परिसरात हा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुणे-नाशिक महामार्गावरून तो स्पष्टपणे दिसतो. जुन्या ठिकाणी चौथऱ्याचे काम झाले आहे. तो खर्च वाया जाणार नाही. त्याठिकाणी दुसरे काही तरी करण्यात येईल.
- शेखर सिंह आयुक्त तथा प्रशासक
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही. परंतु, चौथरा बनविण्यासाठी आतापर्यंत पाच कोटी रुपये खर्च झाला आहे. आता ती जागा बदलून दुसऱ्या जागेत चौथरा केला जाईल. त्यामुळे वाया गेलेला पाच कोटी रुपयांचा खर्च संबंधित शहर अभियंता, सह शहर अभियंता, उपअभियंता, सल्लागार, ठेकेदारांकडून वसूल करावा.
- रमेश वाघेरे, सामाजिक कार्यकर्ते पिंपरी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.