Pimpri Chinchwad News: नवनगर प्राधिकरणाची थकबाकी कोट्यवधींच्या घरात

महापालिकेच्या करसंकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ताकर थकबाकीदार असलेल्या नागरिकांसह संस्थांची नावे वृत्तपत्रांत जाहीर केली जात आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणच्या मोकळ्या जागेचा करोडोंचा कर

PCMC

नवनगर प्राधिकरणाची थकबाकी कोट्यवधींच्या घरात

शेकडो बांधकाम व्यावसायिक मालमत्ताकर भरण्याकडे करताहेत दुर्लक्ष, एक लाखांच्या वर मालमत्ताधारकांकडे तब्बल ६८२ कोटींची थकबाकी

विकास शिंदे: 
महापालिकेच्या करसंकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ताकर थकबाकीदार असलेल्या नागरिकांसह संस्थांची नावे वृत्तपत्रांत जाहीर केली जात आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणच्या मोकळ्या जागेचा करोडोंचा कर थकीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे, तर शेकडो बांधकाम व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, हाॅस्पिटल यांचा बिगरनिवासी मालमत्ताकर वर्षानुवर्ष थकवला जात आहे. महापालिकेने मालमत्ताकर थकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांमधून होऊ लागली आहे.

महापालिकेच्या करसंकलन व आकारणी विभागाच्या वतीने जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लिलावासाठी काढलेल्या मालमत्तांची यादी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केली आहे. सील केलेल्या सर्व मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी त्वरित थकीत कर भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन कर संकलन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात ६ लाख १५ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. सर्वेक्षणातही नोंदणी नसलेल्या मालमत्ताही मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. गतवर्षी करसंकलन विभागाने महापालिकेने प्रथमच ८१४ कोटी रुपयांचा कर जमा केला होता. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत तब्बल ८१८ कोटींचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. करसंकलन विभागाने १ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत.

महापालिकेकडून १७ करसंकलन केंद्रातून वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. करसंकलन विभागाने एक हजार कोटीचे ठेवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी कठोर पाऊले उचलली जात आहेत.

शहरात करसंकलन विभागाच्या वतीने यंदा मालमत्ता जप्ती, सील आणि नळ कनेक्शन खंडित करण्याचा धडाका लावला आहे. असे असले तरी शहरात १ लाखांच्या वर मालमत्ताधारकांकडे तब्बल ८८२ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. या थकबाकीदारांकडून करवसुलीसाठी विभागाने वृत्तपत्रांत नावे प्रसिद्ध करून आता लिलावासारखी कठोर कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या करसंकलन विभागाची नवनगर विकास प्राधिकरणाकडे मोकळ्या मैदानाची १५ कोटी ५२ लाख ६९ हजार २२५ रुपये थकबाकी आहे. मात्र, नवनगर विकास प्राधिकरण आता पीएमआरडीएमध्ये विलिन झालेले आहे. त्यामुळे सर्व मोकळे भूखंड हे पीएमआरडीएच्या ताब्यात आहेत. त्या मोकळ्या जागेची थकबाकी आता पीएमआरडीएकडून कधी भरली जाणार हे पाहावे लागणार आहे. तसेच विद्युत आणि यांत्रिक विभागाकडे १२ कोटी ८३ लाख ७१ हजार ८५१ रुपये, लोकमान्य मेडिकल फाऊंडेशनचे लोकमान्य हाॅस्पिटलकडे ३ कोटी ११ लाख ४२ हजार ७५२ रुपये (कोर्ट केस सुरू), डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स संस्थेकडे ३१ लाख ५३ हजार १०७ रुपये (कोर्ट केस सुरू), सराफ व्यावसायिक राकेश फुलचंद सोनिगरा यांच्याकडे ८ लाख ९८ हजार ९८४ रुपये, अग्रवाल डेव्हलपर्स यांच्याकडे २ लाख ५३ हजार ९०५ रुपये, जय भवानी रोडलाईन्स यांच्याकडे ५ लाख ९९ हजार ०९५ रुपये, अमर ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन यांच्याकडे ८ लाख ३२ हजार ६२५ रुपये, बम्हदत्त शिक्षण मंडळाचे विद्यालय यांच्याकडे ३ लाख ७ हजार ३३० रुपये, एकलव्य बिल्डर्स अरुण अग्रवाल यांच्याकडे १ लाख ९३ हजार रुपये अशा प्रकारे शेकडो बांधकाम व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, हाॅस्पिटल, हाॅटेल व्यावसायिक, वेगवेगळ्या व्यवसायांसाठी महापालिकेकडून जागा भाडे कराराने घेणा-याकडे लाखो रुपये थकबाकी प्रलंबित आहे.

त्या मालमत्ताधारकांकडून थकबाकी वसूल करण्यास महापालिकेने वृत्तपत्रांत थकबाकीदारांची नावे जाहीर केली आहेत. त्या सर्व थकबाकीदारांवर कठोर कारवाई केल्यास एक हजार उद्दिष्ट गाठण्यास जास्त वेळ लागणार नाही. पाणीपट्टी टाकल्यास सर्वसामान्य नागरिकांचे नळ कनेक्शन तोडले जाते. तशीच कारवाई मोठ्या लोकांवरही करण्यात यावी, असा आग्रह नागरिक धरत आहेत. पुणे महापालिकेप्रमाणेच पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही मोठ्या थकबाकीदारांच्या घरासमोर बॅन्ड वाजवून थकबाकी वसूल करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest