मेट्रोच्या अंधारावर पालिकेचा प्रकाश!
(विकास शिंदे)
पिंपरी चिंचवड: जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर महामेट्रोचे काम सुरू होण्यापूर्वी महापालिकेकडून रस्ते दुभाजकांवर पथदिवे लावलेले होते. मात्र, महामेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर अडथळे ठरणारे पथदिवे महामेट्रोकडून काढण्यात आले होते. त्यानंतर मेट्रो सुरू होऊनदेखील पथदिवे बसविले गेले नाहीत. यामुळे महामेट्रोच्या उड्डाणपुलाखाली अंधार पडू लागला आहे. त्यावर महापालिकेच्या विद्युत विभागाकडून चिंचवड ते दापोडीपर्यंत दिव्यांचे खांब बसवून सुशोभीकरण केले जाणार असून त्यावर पालिका तब्बल सहा कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळेच महामेट्रोकडून रस्त्यावर अंधार पडला असून पालिका आपले पैसे खर्च करत उजेड पडणार आहे. (Pimpri Chinchwad News)
चिंचवडच्या मदर तेरेसा उड्डाणपूल ते दापोडीचा हॅरिस पुलापर्यंत मेट्रोची मार्गिका उभारण्यात आलेली आहे. हे काम करताना महामेट्रोने महापालिकेकडून यापूर्वी रस्ते दुभाजकांवर लावलेले पथ दिव्यांचे खांब काढण्यात आलेले आहेत. (Pune Metro News)
सध्यस्थितीत महामेट्रोच्या उड्डाणपुलाखाली रात्रीच्या वेळी अंधार पडू लागला आहे. त्यामुळे विद्युत विभागाकडून तत्काळ पथदिवे बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. महापालिका दिव्यांचे खांब बसवून सुशोभीकरण करणार आहे. त्यासाठी तब्बल सहा कोटींची उधळपट्टी केली जाणार आहे. त्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
विद्युत खांब व दिवे उभारण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने ७ कोटी ९४ लाख २८ हजार ४६८ खर्चाची निविदा काढली होती. त्यात पाच ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. त्यातील दोन ठेकेदार पात्र ठरले. तो खर्च ५ कोटी ९५ लाख ५५ हजार ४६५ इतका आहे. त्या खर्चास आयुक्तांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. दिव्यांचे खांब बसविण्याच्या कामाची मुदत चार महिने राहणार आहे.
मेट्रोच्या जाहिरातीसाठी पालिकेचा खर्च
पिंपरी ते दापोडी मार्गावरील दुभाजकांवरील दिव्यांचे खांब महामेट्रोने तोडले. त्यानंतर मेट्रोची मार्गिका तयार करण्यात आली. असे असताना दिव्यांचे खांब पूर्ववत करण्यासाठी मेट्रोकडून रक्कम घेऊन ते दिवे बाजूच्या दुभाजकावर लावण्यात आले. मार्गिकेच्या खालील जागेवर मेट्रोचा ताबा आहे. तेथे मेट्रो जाहिरात फलक लावून उत्पन्न मिळविणार आहे. त्या जाहिराती आकर्षक दिसण्यासाठी महापालिका दिवे लावण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे.
मेट्रोचे दावे हवेतच
महामेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करून सुशोभीकरण करण्याचा दावा महामेट्रोने केला होता. दुभाजकात हिरवळ व रोपे लावून सुशोभीकरण करणार होते, तसेच प्रत्येक पिलरवर व्हर्टिकल गार्डन विकसित करणार, सांडपाण्याचा पुनर्वापर करणार, अशी अनेक आश्वासने महामेट्रोने दिली होती. मात्र, महामेट्रोच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांची डागडुजी केलेली नाही. मर्ज इन व मर्ज आऊटसाठी तयार केलेला नवा मार्ग पूर्ववत केलेला नाही. दर्जाहीन काम केल्याने अनेक ठिकाणी दुभाजक तुटून पडले आहेत. दुभाजकात हिरवळ न लावल्याने कचरा व राडारोडा साचला आहे.
निगडी ते दापोडी रस्त्याचे महापालिकेकडून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मेट्रो मार्गिकेखालील दोन पिलरमध्ये सुशोभित खांब व दिवे लावण्यात येणार आहेत. हे दिवे डीएमएस प्रकारचे आहेत. विशिष्ट दिवसानुसार वेगवेगळी प्रकाश व्यवस्था करता येणार आहे. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी तिरंगा रंगाची प्रकाश व्यवस्था करता येईल. त्यामुळे हा मार्ग अधिक आकर्षक दिसणार आहे. त्यासाठी महामेट्रोची परवानगी घेण्यात आली आहे.
-संजय खाबडे, सहशहर अभियंता, महापालिका, पिंपरी चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.