Alandi: आळंदीतील सर्व वारकरी शिक्षणसंस्थांची चौकशी करा

आळंदी: येथील वारकरी शिक्षण संस्थेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील एका संस्थाचालकाने तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी त्या संस्थाचालक महाराजाविरोधात गुन्हा दाखल होऊन अटक केली

दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर

आळंदीतील संस्थांमध्ये अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार, संभाजी ब्रिगेडची बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बाल कल्याण विभागाकडे तक्रार

आळंदी: येथील वारकरी शिक्षण संस्थेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील एका संस्थाचालकाने तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी त्या संस्थाचालक महाराजाविरोधात गुन्हा दाखल होऊन अटक केली असून त्या महाराजाची वारकरी शिक्षण संस्था (Warkari Shikshan Sanstha) देखील बेकायदा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आळंदीतील (Alandi) अनेक वारकरी शिक्षण संस्था कार्यरत आहेत. यापूर्वी देखील अल्पवयीन मुलांवरील अनैसर्गिक अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे सर्व वारकरी शिक्षण संस्थांची चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड संघटनेने केली आहे. (Pimpri Chinchwad News)

याबाबत संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, महिला व बाल कल्याण विभाग पुणे, धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. काळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आळंदी तीर्थक्षेत्रात शेकडो कीर्तनकार महाराज मंडळींकडून वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली अनेक  वारकरी विद्यार्थी वसतिगृह नियमबाह्य पद्धतीने चालवली जात आहेत. हे वारकरी विद्यार्थी वसतिगृह चालवताना शासनाच्या समाज कल्याण विभागाचे नियम, अटींचे पालन केले जात नाही.

अल्पवयीन मुलांची अनेक मार्गाने शारीरिक आणि मानसिक पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विविध महाराज मंडळी ही आर्थिक मोबदला घेऊन विविध प्रकारच्या मिरवणुकीत भर उन्हामध्ये लहान निष्पाप मुलांना फिरवत असतात. वेगवेगळ्या गावच्या सप्ताहाच्या कीर्तनात तास-न-तास टाळ मृदंग घेऊन उभे करतात, गावोगावी मिरवणुकीसाठी पाठवले जाते. त्याचबरोबर भोजनाचा खर्च वाचावा म्हणून आळंदीत वेगवेगळ्या सप्ताहाच्या पंक्तीत, लग्नाच्या पंक्तीत त्या लहान मुलांना वारकरी वेश परिधान करून घुसवले जाते. यापूर्वी देखील आळंदी भागातील वारकरी शिक्षण संस्थांमध्ये अशाप्रकारे अनेक निष्पाप बालकांवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. असे गैरप्रकार सातत्याने होऊनही येथील वारकरी संस्थांच्या कारभाराची  चौकशी होत नाही. अलीकडच्या काळात पालकांनी केलेल्या तक्रारीवरून आळंदी पोलीस स्टेशनमध्ये वारकरी शिक्षण संस्थाचालक महाराजाविरुद्ध म्हणजेच दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर (वय ५२) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १९/२०२४ कलम भादंवि ३७७ व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४, ५ (एफ), ६, ८, १० अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. यावरून धार्मिक संस्कार तर सोडाच, याउलट धार्मिकतेच्या नावाखाली लहान मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. यातील काही प्रकरणे महाराज लोकांचे नाव खराब होऊ नये म्हणून स्थानिक एजंटच्या मार्फत मिटवली जात आहेत. अनेक दुर्दैवी घटनांमध्ये गुन्हे दाखल होतातच असे नाही. तर जे गुन्हे दाखल होतात अशा काही प्रकरणांत काही बुवांना न्यायालयाकडून शिक्षाही ठोठावण्यात आल्या आहेत, ते शिक्षा भोगत आहेत.

हे महाराज वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेणाऱ्या सुसंस्कृत महाराष्ट्राला अशोभनीय वर्तन करत आहेत. आळंदी विभागातील ज्या वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थी वसतिगृहाच्या नियमानुसार असतील त्यांना रीतसर परवानगी देऊन, त्या शासकीय नियमाच्या कक्षेत आणणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक संस्थेची पोलीस प्रशासन, शासनाच्या महिला व बालकल्याण विभाग, समाज कल्याण विभाग, धर्मादाय आयुक्त यांच्याकडून अधून-मधून तपासणी करण्यात यावी. प्रत्येक संस्थेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात यावेत,  या कॅमेऱ्यांचा ॲक्सेस ऑनलाइन पद्धतीने हा त्या-त्या मुलांच्या पालकांना देण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपाध्यक्ष वैभव जाधव यांच्या स्वाक्षरी आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest